कचरा टाकण्यास आलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना बनेवाडीकरांनी पिटाळले

सुषेन जाधव
बुधवार, 14 मार्च 2018

कचरा टाकण्यास आलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना गाड्यांसह बनेवाडी (ता. औरंगाबाद) येथील नागरिकांनी बुधवारी (ता. 14) अक्षरशः पिटाळून लावले.

औरंगाबाद : कचराप्रश्नी औरंगाबाद महापालिकेची कोंडी दिवसेंदिवस वाढतच असून कचरा टाकावा कुठे यासाठी महापालिका कर्मचारी शहरालागतची ठिकाणे शोधत आहेत. असेच ठिकाण शोधून कचरा टाकण्यास आलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना गाड्यांसह बनेवाडी (ता. औरंगाबाद) येथील नागरिकांनी बुधवारी (ता. 14) अक्षरशः पिटाळून लावले.

जुने बनेवाडी येथील रेल्वे पुलाजवळ महापालिका प्रशासनाने चारपाच दिवसांपूर्वी जेसीबीद्वारे 15 बाय 12 चा खड्डा केला होता. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी विचारणा करताच पुलालगत रस्ता बनवण्यासाठी करत आहोत असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे नागरिक म्हणाले. मात्र खड्डा केल्यानंतर चारपाच दिवस काहीच हालचाल दिसली नाही. महापालिकेकडून शहरातील नागरिकांच्या विरोधाला जुमानत चोरट्या पद्धतीने कचरा टाकण्याच्या घटना घडल्याने बनेवाडीचे नागरिक सावध होते आणि अखेर बुधवारी सकाळी महापालिकेचे कचरा भरून आलेले दोन डंपर दिसताच नागरिक गोळा झाले आणि जोरदार अक्षरशः गाड्यासह पिटाळून लावले. विरोध करण्यात प्रामुख्याने महिलांचा अधिक सहभाग होता. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता बनेवाडीकरांसमोर निष्पळ ठरला.

Web Title: marathi news aurangabad garbage corporation worker fight