आंदोलकांनी घातले प्रशासनाचे श्राद्ध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - नारेगाववासीयांनी कचरा डेपोविरोधात सुरू केलेल्या आंदोलनाला रविवारी (ता. २५) दहा दिवस झाले; मात्र अद्यापही महापालिकेने यावर तोडगा काढला नाही. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी रविवारी महापालिकेच्या नावाने श्राद्ध (दहावा) घालून कचरा डेपोवर पिंडदान केले. दरम्यान, पिंडाला कावळा नव्हे; तर कुत्रा शिवला पाहिजे म्हणत आंदोलकांनी कचरा डेपोवर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना घास घातला. 
कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी नारेगाव व परिसरातील ग्रामस्थांनी गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. 

कचऱ्याचा एकही ट्रक येऊ दिला जात नसल्याने शहरात हजारो टन कचरा साचला आहे. यामुळे शहराचा उकिरडा झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून कचरा नियमित उचलला जात असून, कचरा त्या-त्या भागात महापालिकेच्या मिळेल त्या जागेवर साठविण्यात येत आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याने कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. महापालिका प्रशासनाच्या वतीने व लोकप्रतिनिधींच्या वतीने कचरा टाकण्यासाठी जागांचा शोध घेतला जात असला तरी अद्याप यातून ठोस मार्ग निघत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे रविवारी श्राद्ध घालण्यात आले. चार युवकांनी या वेळी मुंडण केले. नंतर अंघोळी करून पिंडदान करण्यासाठी ‘कचरा डेपो हटलाच पाहिजे’, ‘महापालिका प्रशासनाचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय’ अशा घोषणा देत आंदोलक कचरा डेपोवर गेले. पिंडदान केल्यानंतर कावळ्याने घास शिवला पाहिजे असा प्रघात आहे; मात्र महापालिका प्रशासनामुळे या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे म्हणून कुत्र्याला घास चारण्यात आला. डेपो हटल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार या वेळी व्यक्‍त करण्यात आला. 

मुख्यमंत्री आले तरीही माघार नाही
आमच्यामुळे शहरवासीयांना कचऱ्याचा त्रास होतोय याची आम्हाला जाण आहे; मात्र आम्ही ३५-४० वर्षे मरणयातना भोगतोय. आम्हाला समजून घ्यावे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आले. त्यांना जे सांगायचे ते सांगितले; परंतु आता मुख्यमंत्री आले तरीही आमचे आंदोलन चालूच राहणार, असे आंदोलकांनी सांगितले. या वेळी पुंडलिकअप्पा अंभोरे, डॉ. शिवाजी डक, मनोज गायके, माजी पंचायत समिती सभापती सुनील हरणे यांच्यासह आंदोलकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बुधवारी तेरवी
पंचायत समितीचे माजी सभापती सुनील हरणे म्हणाले, ‘‘रविवारी दहावा झाला. तीन दिवसांनी बुधवारी (ता. २८) महापालिका प्रशासनाचा तेरावा घालू. यानिमित्ताने कीर्तन ठेवणार आहोत आणि गोडजेवणाची पंगतही दिली जाईल. बागडे नाना येवोत किंवा सीएम येवोत, आम्ही वेळ देणार नाही. २५ लाख लोकांनी या कचऱ्याचा त्रास का सहन करावा,’’ असा सवाल त्यांनी केला.

Web Title: marathi news aurangabad news garbage depo agitation administrative shraddha