कर्नाटकात प्रचारासाठी भाजप नगरसेवक रवाना 

प्रकाश बनकर
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शहरातून मोठ्या प्रमाणावर भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी जाणार आहेत. प्रातिनिधक स्वरूपात चौघांना बंगलोर येथील पक्षाच्या बैठकीसाठी पाठवण्यात आले. त्यांनतर कर्नाटकातील स्थानिक वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनूसार भाजप कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पाठवण्यात येईल. 
- किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष, भाजप
 

औरंगाबाद : येत्या एप्रिल - मे महिन्यात होणाऱ्या कर्नाटका विधानसभासाठी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी भाजपचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. देशभरात भाजपच्या विरोधात संताप व्यक्‍त होत असल्याने याचा परिणाम कर्नाटक येथील विधानसभा निवडणुकीवर होऊ नये, याची विशेष खबरदारी भाजप घेत आहे. यासाठी विविध भागातून प्रचारक रवाना होत असून औरंगाबाद येथून चार नगरसेवक रवाना झाले आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने दिलेले आश्‍वासने पूर्ण करता येत नसल्याने शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षीत बेरोजगारासह विविध समाजबांधव राग व्यक्‍त करीत आहे. दुसरीकडे देशभरात "कॉंग्रेस मुक्‍त भारत' अशी हाक देत भाजप आतापासूनच तयारीला लागला आहे. दरम्यान, कर्नाटकातील कॉंग्रेसची सत्ता मिळविण्यासाठी जोरदार तयारी चालवली आहे. यासाठी विविध राज्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्रचारासाठी बोलविण्यात येत आहे. यानिमित्ताने बेंगळुरू येथे आयोजित बैठकींसाठी औरंगाबादेतून आजी-माजी नगरसेवक कर्नाटक येथे रवाना झाले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमीत शहा यांनी गुजरात आणि नुकत्यात झालेल्या राजस्थान व पश्‍चिम बंगालमधील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर कर्नाटक विधानसभेची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. गुजरातमध्ये 99 जागांवर गाडी अडकल्यानंतर भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानमधील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत देखील पक्षाला हार पत्करावी लागली होती. देशातील मतदारांचा हा बदलता मुड वेळीच रोखत, पुन्हा कमबॅक करण्याच्या उद्देशाने भाजप कर्नाटकात जोर लावत आहे.

कॉंग्रेसच्या ताब्यात असलेले हे राज्य जिंकण्यासाठी अमित शहा यांनी गुजरात प्रमाणेच कर्नाटकात देखील देशभरीतील भाजप कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी नुकतीच बेंगळुरू येथे पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी औरंगाबादेतून भाजपचे नगरसेवक दिलीप थोरात, नितीन चित्ते, माजी नगरसेवक महेश माळवदकर व पदाधिकारी सागर निळकंठ हे दोन दिवसापुर्वी विमानाने बेंगळुरू येथे गेले होते.

कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने प्रत्येक मतदारसंघासाठी तीन पदाधिकारी नियुक्त केले आहेत. या पदाधिकाऱ्यांवर काय जबाबदारी असेल, याची माहिती बंगलोरच्या बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर्नाटक विधानसभेत सध्या कॉंग्रेसचे 123, भाजपचे 44 तर जेडी (एस) चे 40 आमदार आहेत. कॉंग्रेस पुन्हा एकदा मुख्यमंत्री सिध्दरामैय्या यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरली आहे. 
 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शहरातून मोठ्या प्रमाणावर भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी जाणार आहेत. प्रातिनिधक स्वरूपात चौघांना बंगलोर येथील पक्षाच्या बैठकीसाठी पाठवण्यात आले. त्यांनतर कर्नाटकातील स्थानिक वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनूसार भाजप कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पाठवण्यात येईल. 
- किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष, भाजप, औरंगाबाद. 
 

Web Title: marathi news Aurangabad news karnatak election bjp