...अखेर शरद पवारांच्या सभेला परवानगी

राजेभाऊ मोगल
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

हल्लाबोल यात्रेला मराठवाड्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सरकारच्या विरोधात वातावरण तापलेले आहे. त्यामुळे सरकार दडपशाहीचे प्रयत्न करीत आहे. कुठल्याही परिस्थितीत सरकारच्या या भूमिकेला आम्ही जुमानणार नाही. ठरल्याप्रमाणे नियोजित स्थळी ज्येष्ठ नेते पवार यांची सभा होईल.
- सुनील तटकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

औरंगाबाद : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने काढलेल्या मराठवाडास्तरीय हल्लाबोल यात्रेचा शनिवारी (ता. 3) येथे समारोप होणार आहे. यानिमित्त पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नियोजित सभेला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. अखेर मोठ्या घडामोडीनंतर शुक्रवारी (ता.२) रात्री उशीरा परवानगी देण्यात आली. तत्पूर्वी या प्रकाराने संतप्त झालेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियोजित ठिकाणी श्री. पवार यांची सभा होणारच, असे ठणकावून सांगितले होते.

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात काढण्यात आली. तुळजापूर येथून सुरू झालेली ही यात्रा आठही जिल्ह्यांत गेली. या यात्रेचा समारोप येथे होत आहे. सकाळी अकराला शहरातील क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी दोनच्या सुमारास या मोर्चाचे रूपांतर श्री. पवार यांच्या जाहीर सभेत होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. 2) सायंकाळपर्यंत पोलिसांनी सभेला लेखी परवानगी दिलीच नव्हती. असे असले तरी विभागीय आयुक्त कार्यालयाजवळील दिल्ली गेटसमोर व्यासपीठ उभारणीचे काम सुरू होते. परवानगी नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत पोलिसांनी काम थांबवले होते. ही बाब कळताच सुभेदारी शासकीय विश्रामगृहात थांबलेल्या श्री. मुंडे यांनी धाव घेतली व व्यासपीठाचे काम कुणी थांबवले, याचा पोलिसांना जाब विचारला. यापूर्वी येथे भाजप नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत का, आता सभेसाठी विभागीय आयुक्त कार्यालायात घुसू का, सभा होऊ दिली नाही तर हजारो कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावर बसू, असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर पोलिसांनी काही अडचण नाही, "ओके' म्हणत काढता पाय घेतला. 

व्यासपीठ उभारण्याच्या परवानगीवरून दिवसभर वाद निर्माण झाला असला तरी नियोजित ठिकाणी सभा होणारच, असे तटकरे यांनीही स्पष्ट केले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या स्वाक्षरीनेे सभेला परवानगी असल्याचे पत्र देण्यात आले. हल्लाबोल मोर्चा व सभेची जय्यत तयारी झाली असून, मराठवाड्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेते. दरम्यान, या सभेत श्री. पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हल्लाबोल यात्रेला मराठवाड्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सरकारच्या विरोधात वातावरण तापलेले आहे. त्यामुळे सरकार दडपशाहीचे प्रयत्न करीत आहे. कुठल्याही परिस्थितीत सरकारच्या या भूमिकेला आम्ही जुमानणार नाही. ठरल्याप्रमाणे नियोजित स्थळी ज्येष्ठ नेते पवार यांची सभा होईल.
- सुनील तटकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

Web Title: Marathi news Aurangabad news Sharad Pawar in Hallabol campaign