क्रांती चौकात घोंगावले शिवप्रेमींचे वादळ

राष्ट्रमाता जिजाऊ आणि शिवबाच्या वेशात चिमुकले.
राष्ट्रमाता जिजाऊ आणि शिवबाच्या वेशात चिमुकले.

औरंगाबाद - क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा परिसर सोमवारी (ता. १९) शिवप्रेमींच्या अलोट गर्दीने आणि उत्साहानेच दुमदुमून गेला होता. फेटे, झेंडे, ढोल, ताशा, झांजपथकाने तयार झालेले भगवे वादळ आणि ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी तर अवघा आसमंत दुमदुमला. हेलिकॉप्टरमधून पहिल्यांदाच झालेली पुष्पवृष्टी डोळे दीपवणारी ठरली. अनेकांनी घरांसमोर रांगोळी काढत घरांवर भगवे ध्वज फडकविले.

छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी क्रांती चौकात सकाळपासूनच शिवप्रेमी गर्दी करीत होते. मराठा क्रांती मोर्चातर्फे दीडशे जणांच्या ढोलपथकाने शिवरायांना मानवंदना दिली. पथकाचे सादरीकरण तीन ते चार तास सुरू होते. यात मुलींचा सहभाग लक्षणीय होता. शहरातील रस्ते भगवेमय झाले होते. दुचाकी, चारचाकीला भगवे झेंडे लावत जत्थेच्या जत्थे क्रांती चौकात थांबत होते. शिवरायांचा जयघोष सुरूच होता. काही तरुण-तरुणी शिवराय, जिजाऊंच्या पेहरावात, तर काही मावळ्यांच्या पेहरावात आले होते. चंद्रकोर लावलेल्या तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय होती.

‘कुळवाडीभूषणकार’ महात्मा जोतिबा फुले यांची प्रतिमा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित निळे ध्वज घेऊन अनेक शिवभक्‍त अभिवादनासाठी क्रांती चौकात दाखल झाले होते. शिवजयंती महोत्सव समिती, संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी वेगवेगळ्या मंचांवर नागरिकांचे स्वागत करीत होते. अश्‍वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासोबत संघटनांनी शिवरायांच्या प्रतिमा आणि अर्धपुतळे या ठिकाणी ठेवले होते. अभिवादनासाठी जमलेले लोक शिवरायांच्या पुतळ्यासोबत फोटो घेण्यासाठी जेवढे उत्साही दिसले, तितकाच उत्साह आणि चढाओढ जिवंत देखाव्यासोबत सेल्फी घेताना दिसले. शिवजन्मोत्सवात सायंकाळी संगीतरजनीचा कार्यक्रम झाला.

क्रांती चौकात भूमिपूजन
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विधानपरिषदेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुभाष झांबड, विनोद पाटील, उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, विकास जैन, राजू शिंदे, नामदेव पवार, अभिजित देशमुख, बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

अशी पुष्पवृष्टी पहिल्यांदाच...
क्रांती चौकातील शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्यासह मुकुंदवाडी, जयभवानीनगर, पुंडलिकनगर, एन-सात, आविष्कार चौकसह टीव्ही सेंटर येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरही पुष्पवृष्टी करण्यात आली. हेलिकॉप्टर येताच, शिवप्रेमींनी गगनभेदी घोषणा दिल्या. याप्रकारे पहिल्यांदाच पुष्पवृष्टी होत असल्याने ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात जमले होते. 

असे होते पेहराव...
शिवजयंतीनिमित्त शिवराय, जिजाऊ तसेच मावळ्यांच्या पेहरावात शिवप्रेमी आले होते. सायकल, दुचाकी, रिक्षा, चारचाकींवर मोठ्या डौलात भगवे झेंडे फडकत होते. मुलांनी पांढरा कुर्ता, पायजम्यासह फेटे, कपाळी केसरी गंध, चंद्रकोर आणि हातात झेंडे होते. मुलींनी नववारी, नाकात नथ आणि डोक्‍यावर भगवा फेटा अशा पारंपरिक पेहरावात आल्या होत्या. यात महिलाही मागे नव्हत्या.

सजीव देखाव्यांतून वास्तवाची मांडणी 
अलीकडे जात-धर्म यात तेढ निर्माण होत असल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता टिकून राहावी, यासाठी सर्वधर्म समभावचा संदेश देण्यासाठी सिडकोतील शिवछत्रपती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले. ही प्रा. रमेश धोंडगे यांची संकल्पना होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या काळातील सुखी-समृद्ध शेतकरी आणि आताच्या काळातील आत्महत्या करणारे कर्जबाजारी शेतकरी या दोन्ही परस्परविरोधी परिस्थितीचा सजीव देखावा सादर केला. तो प्रत्येकास विचार करण्यास भाग पाडणारा होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com