शिवरायांच्या लढाया धर्मयुद्ध नव्हतेच - श्रीमंत कोकाटे 

अतुल पाटील
बुधवार, 14 मार्च 2018

शिवरायांची तलवार कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हती, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट यासाठीच चालली. मंदिरे वाचवली तशी, मशिदींनाही निधी दिला. याची इतिहासात नोंद आहे.

औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमविरोधी नव्हतेच. तशी प्रतिमा विशिष्ट वर्गाने मुद्दाम तयार केली आहे. शिवरायांच्या लढाया या राजकीय होत्या, ते धर्मयुद्ध कधीच नव्हते. असे स्पष्टं करताना श्रीमंत कोकाटे यांनी शिवरायांना हिंदुत्ववादी ठरवणाऱ्यांना सनसनीत चपराक दिली आहे. 
छत्रपती शिवबा-महात्मा फुले जयंती महोत्सवानिमित्त व्याख्यानात श्री. कोकाटे बोलत होते.

ते म्हणाले, "शिवरायांची तलवार कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हती, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट यासाठीच चालली. मंदिरे वाचवली तशी, मशिदींनाही निधी दिला. याची इतिहासात नोंद आहे. शिवरायांच्या स्वराज्यात जातिभेद नव्हता. म्हणूनच महात्मा फुलेंनी लिहिलेल्या पोवाड्यात कुळवाडीभूषण असा उल्लेख आढळतो. आजचा समाज जाती, धर्माच्या विद्वेषाने पोखरून गेला आहे. हे संकट दूर करून ऐक्‍य निर्माण करायचे असेल, तर छत्रपती शिवाजी, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. वारकरी आणि सुफी पंथांनी समता दाखवली, त्यांचाच पगडा शिवरायांवर होता. तेच मार्गदर्शक होते. शिवराय हे बुद्धिप्रामाण्यवादी होते, विज्ञानवादी होते, ग्रंथप्रामाण्यवादी नव्हते. रयतेला मदत करणे हे पुण्य आणि वाऱ्यावर सोडणे हे पाप, ही त्यांची पाप-पुण्याची संकल्पना होती. ती बहुजनांनी आत्मसात केली पाहिजे. क्रांतीची सुरवात कुटुंबापासून करायची असते, हे महात्मा फुलेंनी शिकवले. लोकांमधला कर्मठपणा जावा, यासाठी महात्मा फुलेंनीच प्रयत्न आहेत.''

छत्रपती संभाजी, तुकारामांचा झालेला छळाचा बाबासाहेबांनी कायद्यातून बदला घेतला असल्याचेही ते म्हणाले. यावेळी प्रा. प्रतिभा अहिरे यांनीही मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रांत मोलाची कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठानतर्फे गौरव करण्यात आला. माजी मंत्री गंगाधर गाडे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. कार्यक्रमाला विजय नवल पाटील, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, निर्मला पाटील यांची उपस्थिती होती. मिलिंद पाटील यांनी प्रास्ताविक केले. 

Web Title: marathi news aurangabad shivaji maharaj speech program