कचऱ्याची धग अद्यापही विझेना!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

औरंगाबाद - हनुमान टेकडी परिसरात एकदा कचरा टाकण्याचा बेत फसल्यानंतर पुन्हा या भागाकडे महापालिका आपला मोर्चा वळवणार असल्याचे कळताच पहाडसिंगपुरा आणि बेगमपुरा भागातील नागरिकांनी या विरोधात शड्डू ठोकला आहे. शनिवारी (ता. तीन) या भागातील नागरिक ठिकठिकाणी ही वाहने माघारी पाठविण्यासाठी ठिय्या मारून बसलेले होते. 

शहरात कचरा टाकण्यासाठी महापालिका नव्या जागांचा शोध घेते आहे. या जागांच्या यादीत कांचनवाडी, पडेगाव गोलवाडीसह शहराचे महत्त्वाचे पर्यटनस्ळ असलेल्या औरंगाबाद लेणी लगतच्या खुल्या जागेची निवड केली आहे. या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी आणलेली पंधरा वाहने नागरिकांच्या रोषामुळे माघारी फिरविली होती. शनिवारी (ता. तीन) सकाळी साडेसातला ही वाहने पहाडसिंगपुरा भागात येणार असल्याची कुणकुण लागताच नागरिकांनी मुख्य रस्त्याची वाट धरली. दिवसभर या वाहनांची वाट पाहत नागरिक रस्त्यावर थांबलेले होते. 

एमआयडीसीकडे जागेची मागणी
शहरालगत असलेल्या एमआयडीसीच्या मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकू द्यावा, अशी विनंती महापालिकेने शनिवारी (ता. तीन) सकाळी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीलमधील जागा कचरा टाकण्यासाठी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती; पण एमआयडीसीने त्याला नकार दिल्याने चिकलठाणा एमआयडीसीत हा कचरा येण्याची नामुष्की टळली. 

आयुक्त, महापौरांच्या दालनालगत जाळला कचरा 
महापालिकेत जेथून आयुक्त आणि महापौर शहराचा कारभार चालवतात त्या इमारतीपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असलेल्या नई बस्तीच्या कचरा कुंडीलाच महापालिकेच्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्याने काडी लावली. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार कचरा जाळण्यास मनाई असताना येथे कचरा पेटवून देण्यात आला.

Web Title: marathi news garbage aurangabad marathwada