तालुका कृषी अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

जालना - समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीवरील झाडांचे मूल्यांकन वाढून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोन व्यक्‍तींना मंगळवारी (ता. २७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर व राउंडही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, ही लाच संशयित तालुका कृषी अधिकारी रामेश्‍वर रोडगे याच्या  सांगण्यावरून स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रोडगे यालाही ताब्यात घेतले आहे. 

जालना - समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीवरील झाडांचे मूल्यांकन वाढून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोन व्यक्‍तींना मंगळवारी (ता. २७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर व राउंडही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, ही लाच संशयित तालुका कृषी अधिकारी रामेश्‍वर रोडगे याच्या  सांगण्यावरून स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रोडगे यालाही ताब्यात घेतले आहे. 

तक्रारदार यांची जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. कृषी विभागामार्फत या शेतजमिनीतील झाडांचे तीन कोटी एक लाख रुपये मूल्यांकन काढण्यात आले होते; मात्र काही दिवसांनंतर तक्रारदार यांनी उपविभागीय कार्यालयातून झाडांचे मूल्यांकन हे दोन कोटी सतरा लाख रुपये करण्यात आल्याची माहिती तक्रारदार यांनी मिळाली. त्यामुळे तक्रारदाराने झाडांचे फेरमूल्यांकन करण्यासंदर्भात अर्ज दिला. याच काळात तालुका कृषी अधिकारी रोडगे याचा एजंट संशयित सुभाष गणपतराव खाडे (वय ४०, रा. जांबसमर्थ, ता. घनसावंगी, जि. जालना) याने तक्रारदाराची भेट देऊन कृषी अधिकारी रामेश्‍वर रोडगे यांनी पाठविल्याचे सांगत झाडांच्या मूल्यांकन वाढीसाठी २० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यावर तक्रारदार यांनी एजंट सुभाष खाडे आणि संशयित अनंत बाबूराव नाल्टे ऊर्फ माने (वय ६८, रा. रवळगाव, ता. सेलू, जि. परभणी) या दोघांना पाच लाख रुपये दिले; तसेच साडेसात लाखांचे दोन चेक दिले. त्यानंतर काही दिवसांनी तक्रारदार यांच्या खात्यात संपादित झाडे व इतर मिळून आठ कोटी रुपये जमा झाले. दरम्यान, तक्रारदार यांच्या पाच वर्षांच्या मुलाच्या नावे असलेल्या शेतजमीन देखील समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. या शेतजमिनीवरील झाडांचे कृषी विभागाकडून ३९ लाख रुपयांचे मूल्यांकन करण्यात आले; परंतु तक्रारदार यांनी उपविभागीय कार्यलयामध्ये माहिती घेतली असता, या झाडांचे मूल्यांकन हे १६ हजार असल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे तक्रारदार यांनी पुन्हा फेरमूल्यांकनासाठी अर्ज दिला. त्या वेळी या संदर्भात खाडे व मानेसोबत बोलणी झाली असता, पूर्वीच्या कामाचे १५ लाख रुपये दिले नाही तर मूल्यांकनात बदल होणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे याबाबत तक्रार केली.

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. २७) नूतन वसाहत येथील उड्डाणपुलाखाली लाचेची रक्कम स्वीकारताना अनंत बाबूराव नाल्टे ऊर्फ माने, सुभाष गणपतराव खाडे या दोघांना ताब्यात घेतले; तसेच त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर व राउंड जप्त केले आहेत. शिवाय त्यांचे वाहनही जप्त केले. या प्रकरणी संशयित तालुका कृषी अधिकारी रामेश्‍वर अण्णासाहेब रोडगे, अनंत बाबूराव नाल्टे ऊर्फ माने, सुभाष गणपतराव खाडे आणि बालासाहेब ज्ञानोबा वाघमारे (रा. रवळगाव, ता. सेलू, जि. परभणी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. या चार संशयितांविरोधात कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: marathi news jalana news tahsil agriculture officer sbi arrested