#अभिजातमराठी - 'ट्‌विटर'करांची एकजूट

सुशांत सांगवे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

लातूर - मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राजकीय नेत्यांची एकजूट दिसत नसली तरी "ट्‌विटर'वरील भाषाप्रेमींमध्ये मात्र ती पाहायला मिळत आहे. त्यांनी "ट्‌विटर'वरच चळवळ सुरू केली असून या माध्यमातून पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री यांच्यासह वेगवेगळ्या पक्षांतील नेत्यांना "मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा मिळणार' असा सवाल विचारला जात आहे.

जवळपास चार वर्षांपूर्वी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या समितीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठीचा अभ्यासपूर्ण अहवाल सरकारकडे सुपूर्द केला; पण या अहवालाला अद्याप मान्यता मिळाली नाही. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद यासारख्या संस्थांनी मराठीला हा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना पत्रे पाठविली; तरीही अपेक्षित उत्तर मिळाले नाही. या सर्व बाबींचा विचार करून ट्‌विटरवरील भाषाप्रेमी एकत्र आले आहेत.

"मराठी रिट्विट' हे ट्‌विटर हॅंडल वापरणारे स्वप्नील पाटील म्हणाले, "ही चळवळ म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी निर्माण केलेला "ऑनलाइन दबाव गट' आहे. या माध्यमातून राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या नेत्यांना, विरोधकांना प्रश्‍न विचारले जात आहेत. त्यांच्यावर दबाव आणणे, लोक या प्रश्‍नाबाबत जागरूक आहेत हे सरकारला दाखवणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. याबरोबरच अभिजात दर्जा म्हणजे काय, तो मिळाल्याने काय फायदा होतो, त्याचे महत्त्व काय, इतर कोणत्या भाषांना हा दर्जा मिळाला आहे, अशी माहितीही ट्‌विटरवरून सांगितली जाणार आहे. "अभिजात मराठी' हा हॅशटॅग वापरून लोकांनी या चळवळीत सहभागी होऊन राजकीय नेत्यांना प्रश्‍न विचारावेत, असे आवाहनही पाटील यांनी या वेळी केले.

ट्‌विटरवरील चळवळीत हे सहभागी

Web Title: marathi news latuer news abhijat marathi twitter marathi language day special