प्रकाश आंबेडकरांनी ऐक्‍याचा राजा व्हावं ; रामदास आठवलेंचे आवाहन

योगेश पायघन
रविवार, 14 जानेवारी 2018

शिवसेनेसोबत माझे फाटले नसून शिवसेना भाजपातील सर्व आटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढणार नाहीत, असा टोलाही आठवले यांनी लगावला. 

औरंगाबाद : समाजातील घटकांना एकत्र आणून ऐक्‍य झाले पाहिजे ही माझी भूमिका आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांशिवाय ऐक्‍य शक्‍य नसल्याने मी दुय्यम स्थान स्वीकारत प्रकाश आंबेडकरांनी ऐक्‍याचा राजा व्हावे. मी सरदार आहेच, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि   केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त रविवारी (ता. 14) सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दलित समाज, कार्यकर्ते तसेच नेत्यांमध्ये ऐक्‍य होणे गरजेचे आहे. तळागाळातील ऐक्‍य होण्यासाठी गटबाजी न करता पुढे यावे लागेल. त्यासाठी फॉर्म्युला ठरवणे गरजेचे आहे. कोणासोबत जायचे हे मताधिक्‍याने ठरवले पाहिजे. माझे मंत्रिपद घालवण्यासाठी ऐक्‍याचा नारा दिला जात असेल तो मान्य होणार नसल्याचेही आठवले म्हणाले.

कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत त्यांनी या घटनेत दोषी असणाऱ्या तसेच दलित मराठ्यांमध्ये फूट पडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

याशिवाय दलित कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेऊन कॉम्बिंग ऑपरेशन थाबविण्याची विनंती केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामागे मराठा व हिंदुत्ववादी संघटनांचा पूर्वनियोजित कट असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. प्रकाश आंबेडकरांना माझा विरोध नाही. बंद होणारच होता. समाज आगोदरच रस्त्यावर उतरला होता. त्यामध्ये माझा पक्ष आघाडीवर होता. त्यामुळे मोठे होण्याचा किंवा बॅकफूटवर जाण्याचा प्रश्‍नच नाही. योग्यवेळी मला फ्रंटफूटवर कसे यायचे ते माहीत असल्याचा टोला आठवलेंनी लगावला. 

18 वर्षे संघर्ष केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा नामविस्तार झाला. त्यासाठी लाखो लोकांनी लढ्यात सहभाग दिला. अनेकांना शहीद व्हावे लागले, अशा सर्वांना आदरांजली वाहत युवकांनी दिलेली एक मंचचा प्रयोग स्तुत्य असला तरी ऐक्‍याचा फॉर्म्यला ठरत नाही, तोपर्यंत याला अर्थ नसल्याचे आठवले म्हणाले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दर्जा सुधारावा येथील विद्यार्थ्यांना सन्मान मिळावा, यासाठी कुलगुरुंनी प्रयत्नशील रहावे. विद्यापीठाला आवश्‍यक निधी आणि विभागाला मान्यता मिळून देण्यासाठी जावडेकरांशी चर्चा करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. 

शिवसेना-भाजपातील सर्व आटलं

शिवसेनेसोबत माझे फाटले नसून शिवसेना भाजपातील सर्व आटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढणार नाहीत, असा टोलाही आठवले यांनी लगावला. 

अभिमत विद्यापीठातही मिळावी शिष्यवृत्ती 

गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळवलेल्या अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा. त्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु तर दोन हफ्त्यात शिष्यवृत्ती वाटप केली जावी. यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

Web Title: Marathi news local news politics prakash ambedkar should become a king of unity says MoS Ramdas Athvale