केवळ पाच हजार कोटींचीच कर्जमाफी : पृथ्वीराज चव्हाण

अतुल पाटील
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत संख्येचे राजकारण होऊ नये, मात्र तरीही आकडेवारी पाहिली तर हे सरकार असंवेदनशील असल्याचे दिसते. बॅंकेच्या व्याजदरासाठी हे सरकार शेतीमालाच्या किंमती दाबून ठेवण्याचे काम मुद्दामहून करत आहे. 

औरंगाबाद, ता. 5 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला शेतकरी कर्जमाफीला विरोध केला. शेतकऱ्यांनी तगादा लावल्यानंतर कर्जमाफीस तयार झाले. तेव्हा असलेला 34 हजार कोटी रुपयांचा आकडा, अटी शर्तीनंतर पाच हजार कोटी रुपयांवर येईल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्‍त केले. 

एमजीएममध्ये गुरुवारी (ता. 5) राजकारणातील नैतिकता शिल्लक राहिली आहे का? याविषयावर व्याख्यानानंतर विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात श्री. चव्हाण बोलत होते. भाजपा सरकारच्या काळात आत्महत्या होत आहेत, त्याप्रमाणे कॉंग्रेस सरकारच्या काळातही झाल्या. आजही त्या थांबत नाहीत. सरकार असंवेदनशील आहे का? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. यावर श्री. चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत संख्येचे राजकारण होऊ नये, मात्र तरीही आकडेवारी पाहिली तर हे सरकार असंवेदनशील असल्याचे दिसते. बॅंकेच्या व्याजदरासाठी हे सरकार शेतीमालाच्या किंमती दाबून ठेवण्याचे काम मुद्दामहून करत आहे. 

भारतातील मीडिया मल्टीनॅशनल कंपनीच्या हातात जात असून एकाच मालकाच्या हातात सर्व प्रकारची माध्यमे जाणे हे देशासाठी धोकादायक आहे. वर्षभरात त्या मालकांची मोनोपॉली वाढेल. अशी भीती श्री. चव्हाण यांनी व्यक्‍त केली. एमजीएममध्ये रेडिओ केंद्राचे आणि जेएनईसीच्या आर्यभट्ट सभागृहाचे उद्‌घाटन श्री. चव्हाण यांच्याहस्ते झाले. 

सोसायटीप्रमाणे पक्ष काढतात 
निवडणुक निधी आणि पक्षांच्या संख्येवर निवडणुक आयोगाने टाच आणली पाहिजे. मागच्या आठवड्यातच एक पक्ष महाराष्ट्रात सुरु झाला. अनेकांना पक्ष निर्माण करणे म्हणजे को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्यासारखे सोपे वाटते. असे म्हणत श्री. चव्हाण यांनी नारायण राणेंना टोला लगावला. पक्षांची संख्या घटवण्यासाठी देशातील मोठ्या पक्षांनी पुढाकार घेत घटनेत बदल करुन घ्यावेत. असा सल्लाही त्यांनी दिला.

Web Title: marathi news marathi websites Farmers Loan Waiver Devendra Fadnavis Mumbai News