कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या बनल्याहेत जनजागृतीचे माध्यम

नवनाथ इधाटे 
रविवार, 4 मार्च 2018

आपल्या घरात निघणारा कचरा ओला कचरा वेगळा डस्टबिनमध्ये जमा करून रोज येणाऱ्या घंटा गाडीतच टाकावा. भविष्यात ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून नगरपंचायत कंपोस्ट खत निर्मिती करण्याच्या प्रकल्प उभारणार आहे. तसेच नागरिकांनी शहरातील नाल्यात व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. 
- योगेश पाटील, मुख्याधिकारी फुलंब्री 

फुलंब्री : नगरपंचायतने दिलेल्या साफसफाई ठेक्याच्या भरवशावरच शहर स्वच्छ होणार असून यामध्ये प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. फुलंब्रीकरांची यांत जाणीव व उत्साह निर्माण करत जनजागृती व्हावी, या उद्देशातून नगरपंचायतने शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्यांना 'म्युझिक सिस्टिम' लावले आहेत.

स्वच्छतेचा संदेश देणारी गीते या 'म्युझिक सिस्टिम'वर दिवसभर गल्लीबोळात सुरू असतात. नगरपंचायतच्या या नव्या प्रयोगाचे शहरवासीयांकडून कौतुक होत असून प्रत्येक नागरिक स्वच्छतामोहिमेत सहभागी होऊन आपल्या परिसरातील कचरा घंटागाडीतच टाकतांना दिसून येत आहे. फुलंब्री शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी घरात, दुकानात निघणारा कचरा घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी केले. 

स्वच्छ फुलंब्री, सुंदर फुलंब्री हा नारा फुलंब्रीकर सोबत घेऊन आपला परिसर स्वच्छ असावा या उद्देशातून स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला जात आहे. फुलंब्री शहरामध्ये 15 फेब्रुवारी रोजी नगरपंचायतच्या वतीने बी.व्ही.जी इंडिया लि.पुणे या कंपनीला देण्यात आलेल्या साफसफाई कामाचा शुभारंभ इफ्कोचे केंद्रीय संचालक त्र्यंबकराव शिरसाठ यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला आहे. तेव्हापासून रोज सकाळी सहा वाजेपासून बी.व्ही.जी इंडिया लि.पुणे या कंपनीचे कर्मचारी फुलंब्री शहरातील साफसफाई व घंटा गाडीच्या माध्यमातून रोजच्या रोज फुलंब्रीकरांच्या घरातून निघणारा कचरा जमा करून घेऊन जात आहेत. यामुळे मागील 15 दिवसांमध्ये साफसफाईच्या बाबतीत फुलंब्री शहर स्वच्छ व सुंदर दिसत आहे. तसेच साफसफाई करणे ही फक्त या कंपनीचीच जबाबदारी नसून ती फुलंब्री शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, हे नागरिकांच्या मनावर ठसवून देण्याचा प्रयत्न म्युझिक सिस्टिम'च्या माध्यमातून नगरपंचायतीच्या वतीने केला जात आहे. शासनाने लोकांत जनजागृती करता यावी यासाठी संगीत एक माध्यम म्हणून निवडलेले आहे. त्यानुसार फुलंब्री नगरपंचायतने त्यांच्याकडील कचरा गाड्यांना 'म्युझिक सिस्टिम' लावले असून या कचरा गाड्या आता जनजागृतीचे माध्यम बनल्या आहेत. या कचरा गाड्या शहरात निघत असताना त्यात सुरू असलेली स्वच्छतेचा संदेश देणारी गीते नागरिकांना आकर्षित करत आहेत. यातून नागरिकांत स्वच्छतेबाबत जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे कचरा गाडी शहरात फिरत असताना नागरिक थांबून उत्सुकतेने हा प्रकार बघत असून नगरपंचायतच्या या प्रयोगाचे कौतुकही करीत आहे. म्हणूनच नगरपंचायतच्या शहरातील कचरा गोळा करणाऱ्या या घंटागाड्या स्वच्छतादूताचे काम करत असल्याचे बोलले जात आहे. 

आपल्या घरात निघणारा कचरा ओला कचरा वेगळा डस्टबिनमध्ये जमा करून रोज येणाऱ्या घंटा गाडीतच टाकावा. भविष्यात ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून नगरपंचायत कंपोस्ट खत निर्मिती करण्याच्या प्रकल्प उभारणार आहे. तसेच नागरिकांनी शहरातील नाल्यात व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. 
- योगेश पाटील, मुख्याधिकारी फुलंब्री 

फुलंब्रीकरांनी रोजच्या आपल्या घरातील निघणारा कचरा येणाऱ्या घंटा गाडीतच टाकावा. तसेच बाजारपेठेतील दुकानदारांनी सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानातून निघणारा कचरा इतर ठिकाणी न फेकता डस्टबिन जमा करून घंटा गाडीतच टाकून नगरपंचायतीला सहकार्य करा. 
- सुहास शिरसाठ, नगराध्यक्ष फुलंब्री 

रोजच्या रोज घरात निघणारा कचरा घंटागाडी टाकल्याने फुलंब्री शहर हळूहळू स्वच्छ होतांना दिसून येत आहे. तसेच नाल्यांची साफसफाई ही खोदून करण्यात आलेली आहे. बंद पडलेल्या नळ्या सुरळीत सुरु केल्याने हळूहळू बदल दिसून येऊ लागला आहे.
- इंदुबाई मिसाळ, उपनगराध्यक्षा फुलंब्री

Web Title: Marathi news Marathwada news garbage in phulambri