कचरा टाकण्यावरून विष पाजून एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

बाळासाहेब रघुनाथ राठोड (वय ३२) असे मृताचे नाव असून याप्रकरणी पाचही आरोपींवर शुक्रवारी (ता. दोन) गेवराई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीत एका महिलेचा समावेश आहे.

गेवराई (जि. बीड) : स्वच्छतागृहात कचरा टाकल्याचा जाब विचारणाऱ्या एकाचा शेजारच्या पाच जणांनी बेदम मारहाण करत विष पाजून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. एक) सकाळी तालुक्यातील लक्ष्मण तांड्यावर घडली.

बाळासाहेब रघुनाथ राठोड (वय ३२) असे मृताचे नाव असून याप्रकरणी पाचही आरोपींवर शुक्रवारी (ता. दोन) गेवराई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीत एका महिलेचा समावेश आहे.

याप्रकरणी मनीषा बाळासाहेब राठोड यांनी गेवराई ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी सकाळी त्यांच्या घराच्या बाजूच्या शौचालयात शेजारी राहणाऱ्या वंदना प्रकाश राठोड यांनी कचरा टाकला. ही बाब मनीषा यांनी पती बाळासाहेब राठोड यांना सांगितली. याचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब राठोड हे वंदनाचा पती प्रकाश राठोड याच्याकडे गेले असता दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. प्रकाश, वंदना आणि तिथे आलेल्या अविनाश राम राठोड, अंकुश लक्ष्मण राठोड, राम लक्ष्मण राठोड या सर्वांनी मिळून बाळासाहेब आणि मनीषा यांना मारहाण केली. इतरांनी बाळासाहेब यांना खाली पाडून पकडून ठेवले आणि प्रकाशने घरातून विषाची बाटली आणली व  त्यांना पाजली. यावेळी मनीषा यांनी मदतीसाठी केलेली याचना ऐकून शेजारी धावून आले. त्यांनी बाळासाहेब यांना गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले. तिथे उपचार सुरु असताना बाळासाहेब रघुनाथ राठोड यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी प्रकाश अंकुश राठोड, वंदना प्रकाश राठोड, अंकुश लक्ष्मण राठोड, राम लक्ष्मण राठोड आणि अविनाश राम राठोड या पाच जणांवर गेवराई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून सर्व आरोपी फरार आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहेत.

Web Title: Marathi news Marathwada news murder in Gevrai