जागेअभावी तूर खरेदी बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

बीड - जिल्ह्यात तूर खरेदी केंद्र सुरू होऊन महिना उलटला आहे. मात्र, गोदामांमध्ये जुनाच शेतीमाल असल्याने महिनाभरात खरेदी झालेली तूर येथील खरेदी केंद्रावरच पडून आहे. साठवायला जागा नसल्याने तूर खरेदी बंद पडली आहे. खरेदीमाल गोदामात जात नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे मिळायलाही वेळ लागत आहे.

जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या तूर खरेदी केंद्रात अडचणींमुळे वारंवार खरेदी केंद्र बंद ठेवावे लागले. मागच्या महिनाभरात येथील केंद्रावर साडेचार हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. येथील शासकीय गोदामामध्ये सद्यःस्थितीला २० हजार क्विंटल शेतीमाल पडून असल्याने खरेदी केंद्रावर खरेदी केलेली सर्वच तूर तशीच पडून आहे. दरम्यान, खरेदी केलेली तूर ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने येथील केंद्र बंद ठेवण्याबाबत केंद्रप्रमुख खांडे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे पत्र दिले आहे. त्यामुळे ऐनवेळी केंद्र बंद राहिल्याने शेतकऱ्यांची मोठी हेळसांड होत आहे. महिनाभरापासून येथील खरेदी केंद्रावरून तूर शासकीय गोदामात गेलीच नसल्याने शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या तुरीचे पैसे मिळायलाही उशीर होत आहे.

त्यामुळे हमीभाव हा कमी असला तरी वेळेत पैसे मिळावेत अशी मागणी होत आहे. नियमानुसार माप झाल्यापासून १५ दिवसांमध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे आवश्‍यक आहे. तुरीचे वजन झाले, मात्र बिलासंदर्भातील प्रक्रियाच झाली नसल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे केवळ नावालाच खरेदी केंद्र सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.

Web Title: marathi news marathwada tur farmer