मुलाच्या त्रासाला कंटाळून आईची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

मद्यधुंद अवस्थेत दुचाकी घेण्याचा सतत आग्रह करणाऱ्या पोटच्या पोराच्या त्रासाला कंटाळून आईने जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नांदेड - मद्यधुंद अवस्थेत दुचाकी घेण्याचा सतत आग्रह करणाऱ्या पोटच्या पोराच्या त्रासाला कंटाळून आईने जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्‍यातील जांब येथील आंदे कुटुंबातील आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा दुचाकीसाठी आग्रह करत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आई-वडिल काबाडकष्ट करून संसाराची दोरी ओढत होते. या परिस्थितीत त्यांचा धनाजी नावाचा एकुलता एक मुलगा दुचाकी घेण्यासाठी सातत्याने हट्ट करत होता. पालकांनी अनेकदा त्याची समजूत काढत आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर दुचाकी घेऊ असे आश्‍वासन दिले होते. तरीही मद्याच्या आहारी जाऊन दररोज मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन तो आईला शिवीगाळ करत होता. या सततच्या त्रासामुळे आई शेषाबाई पंढरी आंदे (वय 45) त्रस्त होत्या. अखेर मुलाच्या हट्टाचा त्रास असह्य झाल्याने त्यांनी गुरुवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी पंढरी आंदे यांच्या फिर्यादीवरून मुलगा धनाजी विरुद्ध मुखेड पोलिसांनी मरणास प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हाय्यक पोलिस निरीक्षक विनोद कांबळे हे करत आहेत.

मुले ज्यावेळी हट्ट करतात आणि ते पालकांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात; अशा वेळी पालकांनी समुपदेशकाचा सल्ला घ्यावा. पालकांनी पाल्याला घेऊन समुपदेशकाची भेट घेतली तर प्राप्त परिस्थिीततून मार्ग काढण्यासाठी दिशा मिळू शकते. ग्रामीण भागातील पालकांनी जवळचे नातेवाईक, गावातील ज्येष्ठ किंवा कुटुंबाला ओळखत असलेल्या शेजाऱ्यांमार्फत पाल्याचे समुपदेशन करण्याची गरज आहे. पालकांनी अथवा मुलांनी आत्महत्येचा विचार किंवा प्रयत्न हा कितीही अवघड परिस्थितीत पर्याय असू शकत नाही.
नवनाथ गायकवाड, समुपदेशक, पुणे

Web Title: marathi news mother suicide maharashtra news nanded news mukhed news