अक्षय, हर्षल, पराग ठरले विजेते

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद -  सळसळत्या उत्साहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) वक्‍तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदविला. मराठी भाषा दिनानिमित्त झालेल्या स्पर्धेत अक्षय वानखेडे, हर्षल दहिफळे आणि पराग देशमुख विजेते ठरले आहेत.

औरंगाबाद -  सळसळत्या उत्साहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) वक्‍तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदविला. मराठी भाषा दिनानिमित्त झालेल्या स्पर्धेत अक्षय वानखेडे, हर्षल दहिफळे आणि पराग देशमुख विजेते ठरले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्‍त विद्यमाने ‘सकाळ’ कार्यालयात मंगळवारी (ता. २७) ही स्पर्धा झाली. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिसभा सदस्य मयूर सोनवणे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. प्रा. महेश अचिंतलवार, परीक्षक प्रा. डॉ. पुंडलिक कोलते, दीपक पवार यांची उपस्थिती होती. रोपटे देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. नव्या पिढीतील वक्‍ता ज्ञानेश्‍वर चौथमल याचा या वेळी सत्कार करण्यात आला.

स्पर्धेत जेएनईसीच्या अक्षय सुरेश वानखेडे याने प्रथम पारितोषिक पटकावले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हर्षल दहीफळे हिने द्वितीय, तर देवगिरी महाविद्यालयाच्या पराग तुकाराम देशमुख याने तृतीय पारितोषिक पटकावले. विजेत्यांना मयूर सोनवणे आणि डॉ. कोलते, श्री. पवार यांच्याहस्ते बक्षीस आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तर, सहभागी स्पर्धकांना तनिष्का सदस्या शुभांगी लातूरकर आणि अंजली भुमरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

मयूर सोनवणे म्हणाले, ‘‘मीदेखील ‘यिन’चा जिल्हाध्यक्ष होतो. ‘यिन’मुळे प्लॅटफॉर्म मिळाले.’’ तसेच तरुणांनी व्यसन आणि आत्महत्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेपूर्वी प्रा. अचिंतलवार यांनीही मार्गदर्शन केले. स्पर्धेत कांचनवाडीतील सीएसएमएसएसचे कृषी महाविद्यालय, एमजीएचे जेएनईसी, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयटी महाविद्यालय, फोस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथिक महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालयाच्या २३ विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन गणेश गलांडे, मिलिना पाटील यांनी केले. धीरज पवार यांनी आभार मानले.

चिंतनशील वृत्तीचा गंध घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांनी आम्हाला चिंतन करायला भाग पाडले. विषयासंबंधी नानाविधी वृत्ती, प्रवृत्ती, संगती, विसंगती यांचा प्रत्येकाने आढावा घेण्याचा सहजतेने प्रयत्न केला. काही स्पर्धकांच्या बाबतीत विषयांच्या जाणिवा प्रगल्भ असल्याचा प्रत्यय आला. 
- पुंडलिक कोलते, परीक्षक

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे घेतलेली स्पर्धा युवकांना मराठी भाषेविषयी मंथन करायला लावणारी होती. बरेच स्पर्धक वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे असूनही मराठी भाषेविषयी खोलवर विचार करतात, हे समोर आले. मराठी भाषा आणि तरुण पिढी यांचे नाते किती घट्ट आहे, हे या स्पर्धेच्या निमित्ताने अधोरेखित झाले.
- दीपक पवार, परीक्षक

विजेते म्हणतात...
मराठी भाषेचे प्रबोधन ‘सकाळ’च्या माध्यमातून होत आहे. आम्हाला मराठीचा अभिमान आहे. म्हणूनच स्पर्धेत सहभागी झालो. येथे येऊन आमच्या भावना व्यक्‍त करायला मिळाल्या. तरुणांचे विचार ऐकायला मिळाले. तसेच बक्षीस भेटल्याचाही आनंद आहे.
- अक्षय वानखेडे (प्रथम)

स्पर्धेत तोलामोलाचे स्पर्धक होते. यात आवडलेली चांगली गोष्ट म्हणजे परीक्षकांचे मनोगत. त्यातून घेण्यासारखे खूप काही होते. स्पर्धेतून ज्या विषयांकडे तरुणाईचे लक्ष जात नाही, हे विषय हाताळल्याने त्याबाबत आणखी गोष्टी अभ्यासता आल्याचा आनंद आहे.
- हर्षल दहिफळे (द्वितीय)

राज्यभर स्पर्धेत सहभागी होतो. विषय अतिशय सुंदर होते. परीक्षकांच्या मनोगतातून शिकायला मिळाले ती आयुष्याची शिदोरीच होती. ‘सकाळ’ने दरवर्षी अशाप्रकारची स्पर्धा आयोजित करावी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला चालना यातून मिळेल.
- पराग देशमुख (तृतीय)

Web Title: marathi news young inspiration network competition