96 तासांच्या "ब्रेक'नंतर शहरात पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

औरंगाबाद - यंदा जूनच्या सुरवातीपासूनच शहरावर पावसाने कृपा दाखविली. मात्र, मागील चार दिवसांपासून त्याने दडी मारली होती. आभाळही निरभ्र होते. त्यामुळे परिसरात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. पण, 96 तासांच्या ब्रेकनंतर शहरात सोमवारी (ता. 19) सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून काहीअंशी दिलासा मिळाला. या पावसाची 12.6 मिलिमीटर एवढी नोंद झाली. 

औरंगाबाद - यंदा जूनच्या सुरवातीपासूनच शहरावर पावसाने कृपा दाखविली. मात्र, मागील चार दिवसांपासून त्याने दडी मारली होती. आभाळही निरभ्र होते. त्यामुळे परिसरात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले होते. पण, 96 तासांच्या ब्रेकनंतर शहरात सोमवारी (ता. 19) सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून काहीअंशी दिलासा मिळाला. या पावसाची 12.6 मिलिमीटर एवढी नोंद झाली. 

पावसाने मेच्या शेवटी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात शहरवासीयांना चिंब केले होते. पण, तिसऱ्या आठवड्यात अचानक एक्‍झिट घेतली. बुधवारी (ता.14) आणि गुरुवारी (ता.16) शहरात पावसाने हजेरी लावली होती. या दिवशी अनुक्रमे 40 आणि 28 मिलिमीटर पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने केली होती. मात्र, यानंतर पाऊस गायब झाला होता. ऊन वाढले होते. त्यामुळे तापमानातही वाढ झाली होती. 

मात्र, सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने तापमानात काहीअंशी घट झाली. शिवाय शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला. 

का पडला खंड? 
बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला चक्राकार वारे तयार झाले. त्यामुळे औरंगाबाद शहर आणि परिसरावरील पाऊस हटला. सोमवारी सायंकाळी काही वेळासाठी त्याने हजेरी लावली. दरम्यान, ओडिशाच्या काठावर चक्राकार वाऱ्याचे अस्तित्व तयार होत नाही तोपर्यंत शहरात मोठा पाऊस पडण्याची शक्‍यता कमी आहे, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञ पंढरीनाथ साळवे पाटील यांनी व्यक्त केला. साधारण चार ते पाच दिवसांचा कालावधी गेल्यानंतर ओडिशाच्या तटावर चक्राकार वारे तयार होण्याची शक्‍यता असल्याचेही ते म्हणाले. 

दोन अंशांनी तापमान वाढले 
औरंगाबाद शहरावरून ढगांचा घेरा गायब झाल्यानंतर तापमानातही वाढ झाली. गुरुवारी (ता. 15) शहराचे कमाल तापमान 32.8; तर किमान 21.6 अंशांवर होते. रविवारी (ता.18) यात तब्बल 2.1 अंशांची वाढ पाहायला मिळाली. ज्यामुळे उकाडा चांगलाच वाढला आहे. आगामी चार-पाच दिवस असेच वातावरण राहणार असल्याची शक्‍यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे उकाडा वाढू शकतो. 
 

तापमानातील वाढ... 
दिवस -------------कमाल----------किमान 
गुरुवार (ता.15)----32.8----------21.6 
शुक्रवार (ता.16)---33.6----------19.6 
शनिवार (ता.17)---34.0----------19.2 
रविवार (ता.18)----35.0----------23.0 
सोमवार (ता.19)---34.7----------23.0 

Web Title: marathwad news aurangabad rain