गरजांतून जन्माला आले मराठवाड्यातील स्टार्टअप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

अडचणी उभ्या राहिल्या, की त्यावरील उपायांचा शोध सुरू होतो. मराठवाड्यात अडचणींचा ढीग आहे. त्यावर मात करण्यासाठी अनेकांच्या डोक्‍यातून निघणाऱ्या कल्पना मराठवाड्यामध्ये स्टार्टअप म्हणून जन्माला येत आहेत. अडचणींना सामोरे जात उभारलेले उद्योग आज अनेकांसाठी अंधारातील प्रकाशवाटा ठरत आहेत. त्यांचा हा थोडक्‍यात धांडोळा...

महाविद्यालयात केलेला ‘जुगाड’ शेतकऱ्यांच्या पसंतीस 
औरंगाबाद - अडचणी उभ्या राहिल्या, की त्यावरील उपायांचा शोध सुरू होतो. मराठवाड्यात अडचणींचा ढीग आहे. त्यावर मात करण्यासाठी अनेकांच्या डोक्‍यातून निघणाऱ्या कल्पना मराठवाड्यामध्ये स्टार्टअप म्हणून जन्माला येत आहेत. अडचणींना सामोरे जात उभारलेले उद्योग आज अनेकांसाठी अंधारातील प्रकाशवाटा ठरत आहेत. त्यांचा हा थोडक्‍यात धांडोळा...

महाविद्यालयात प्रोजेक्‍ट म्हणून तयार केलेले फवारणी यंत्र अनेकांना ‘जुगाड’ वाटला; मात्र आपण तयार केलेले फवारणी यंत्र शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. एक सायकलचे चाक, त्याला फॅब्रिकेटेड बॉडी आणि त्यावर कोणतेही इंधन न लागणारे फवारणी यंत्र, असे ‘नियो ॲग्रोटेक’ या स्टार्टअपच्या माध्यमातून योगेश गावंडेने तयार केलेले हे यंत्र आहे. महाविद्यालयात करण्यासाठी घेतलेला हा प्रोजेक्‍ट अनेक बक्षिसे जिंकणारा ठरला असून, त्याला आता उत्पादनाच्या रूपात आपण आणले असल्याचे गावंडे याने सांगितले. आपला भाऊ निखिल गावंडेने त्याला यात साथ दिली आणि महाविद्यालयील प्रदर्शनांमध्ये बक्षिसे जिंकणाऱ्या या उत्पादनाच्या जोरावर योगेशने यशस्वी स्टार्टअपचे उदाहरण सर्वांपुढे ठेवले आहे. रस्त्यावर हे यंत्र विकणाऱ्या मूळ चित्तेपिंपळगावच्या या भावंडांनी चिकलठाण्यात २०० चौरसफुटांत या उत्पादनासाठी जागा घेतली. दोन वर्षांत ४३० यंत्रे विकणारी नियो ॲग्रोटेक लवकरच वाळूजमध्ये ऐसपैस जागेत जाणार आहे.

शेतकऱ्यांची समस्या सोडविणारा लहानगा ट्रॅक्‍टर 
देशभरात असलेल्या शेतकऱ्यांमध्ये अल्पभूधारकांची संख्या मोठी आहे; मशागत करणाऱ्यासाठी लागणाऱ्या यंत्राचे भाव जास्त आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी बीड जिल्ह्यातील नामदेव आणेराव यांनी लहानगा ट्रॅक्‍टर तयार केला. या यंत्राच्या साहाय्याने केली जाणारी शेतीची मशागत सोपी तर आहेच; पण त्यासाठी खर्चही कमी लागत लागतो. ‘समजदार ॲग्रो’नावाने उत्पादन सुरू करणारे आणेराव दहा दिवस एका यंत्राच्या निर्मिर्तीसाठी देतात. त्यांच्या या उत्पादनाचे कौतुक म्हणून औरंगाबाद येथे सीएमआयएने आणेराव यांना एक लाखांचे बक्षीस दिले आहे. त्यांच्या या ‘स्टार्टअप’साठीची पेटंट नोंदणी करण्यात आली असून, मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. 

पिंपळनेर (जि. बीड) येथून २५ किमी अंतरावर सध्या अर्धा एकर शेतात हे काम सुरू आहे; मात्र मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यासाठी नामदेव यांच्या पंखाला अधिक बळाची अपेक्षा आहे.

Web Title: Marathwad Startup Machine Need Business Farmer