मराठवाड्यात बहुतांश गटांत बहुरंगी लढती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा आणखी एक महत्त्वाचा, अर्ज माघारीचा टप्पा मंगळवारी (ता. सात) पार पडला आणि चौरंगी, पंचरंगी, बहुरंगी लढतींचे चित्र स्पष्ट झाले. आता प्रचाराच्या धुमशानाने ग्रामीण भाग ढवळून निघणार आहे. येत्या 16 फेब्रुवारीला मतदान होईल. 

औरंगाबाद - जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा आणखी एक महत्त्वाचा, अर्ज माघारीचा टप्पा मंगळवारी (ता. सात) पार पडला आणि चौरंगी, पंचरंगी, बहुरंगी लढतींचे चित्र स्पष्ट झाले. आता प्रचाराच्या धुमशानाने ग्रामीण भाग ढवळून निघणार आहे. येत्या 16 फेब्रुवारीला मतदान होईल. 

मुख्य पक्षांनी दिलेला स्वबळाचा नारा, काही मोजक्‍या ठिकाणी आघाडी, रिंगणात उतरलेले अन्य पक्ष आदींमुळे ही निवडणूक रंगतदार होईल, हे आतापर्यंतच्या वातावरणावरून स्पष्ट झाले आहे. यंदा इच्छुकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे बंडखोरी रोखण्याचे आव्हान सर्वच प्रमुख पक्षांसमोर ठाकले होते. एक फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तेव्हा उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याचे दिसलेच. त्यानंतर सुरू झाली ती अर्ज माघारीसाठी रस्सीखेच आणि मनधरणी. त्यात कुणाला कितपत यश मिळाले हा मुद्दा बाजूला केला तरी एकंदरीत अनेकांनी माघार घेतली आणि अनेक रिंगणातही आहेत. त्याशिवाय बंडखोरी शमविण्यात पक्षांना यश आले नाही, हे काही ठिकाणी अधोरेखित झाले. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असली, तरी काही उमेदवार अपिलात गेले आहेत. त्यामुळे त्या-त्या गटांतील लढतींचे नेमके चित्र नंतर स्पष्ट होईल. बीडमध्ये प्रत्येकी एक गट-गण, नांदेडला दोन गट, एका गणात, जालन्यात एक गट व तीन गणांत अशी स्थिती आहे. काही ठिकाणचे आक्षेप आजच निकाली निघाले आहेत. बहुतांश गट-गणांतील लढतींचे चित्र समोर आल्याने आता प्रचाराची रंगत पाहायला मिळणार आहे. त्यातून ग्रामीण भाग ढवळून निघणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसने प्रचाराचा शुभारंभ केला आहेच. आता नेत्यांच्या सभांनी मराठवाडा गाजणार आहे. 

Web Title: marathwada election