मराठवाड्याला मिळवून दिले हक्काचे पाणी - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नांदेड - मराठवाड्यातील पळवलेले हक्काचे पाणी संघर्ष करून परत मिळवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात रखडलेली रस्ते विकासाची कामेही मार्गी लागत असल्याचे ते म्हणाले. 

नांदेड - मराठवाड्यातील पळवलेले हक्काचे पाणी संघर्ष करून परत मिळवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात रखडलेली रस्ते विकासाची कामेही मार्गी लागत असल्याचे ते म्हणाले. 

लोहा येथून जाणाऱ्या तीन राष्ट्रीय महामार्गांचे भूमिपूजन गुरुवारी (ता. 19) दुपारी बाराला नेट इलेक्‍ट्रॉनिक कळ दाबून करण्यात आले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, भास्करराव पाटील खतगावकर, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर, आमदार तुषार राठोड, विनायक पाटील, सुधाकर भालेराव, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, माजी आमदार किशनराव राठोड, गणेश हाके, गोविंदराव केंद्रे आदींची उपस्थिती होती. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने खारीक-खोबऱ्याच्या हाराने मान्यवरांचा सत्कार झाला. 

फडणवीस म्हणाले की, "दमणगंगा प्रकल्पातील हक्काच्या चौदा टीएमसी पाण्यापासून मराठवाड्याला वंचित राहावे लागले. त्यातील सात टीएमसी पाणी संघर्ष करून परत मिळवले आहे. यापुढे या भागातील गोदावरी खोऱ्याची 50 टीएमसी पाण्याची तूट भरून काढणार आहे. 

माणूस जातीने नाही तर गुणाने मोठा होतो. विकास झाला तरच गरिबी दूर होईल. वीज, पाणी, दळणवळण असल्यास रोजगार निर्मिती होते. त्यामुळेच महामार्ग विकासाची मोहीम हाती घेतली आहे. विकासाचा संबंध जात, भाषा, नाते यांच्याशी नसतो. विकासाच्या कामात जातीयवादी विष कालवू नका, अशा शब्दात गडकरी यांनी विरोधकांवर खोचक टीका केली. यापूर्वी चुकीच्या नेतृत्वामुळे, चुकीच्या आर्थिक धोरणामुळे महाराष्ट्र "व्हिजनलेस' बनला होता. आता मात्र अल्पावधीतच राज्यात हे चित्र बदलले आहे, असेही ते म्हणाले. 

विरोधकांना खुले आव्हान 
परभणी - फडणवीस, गडकरी यांच्या उपस्थितीत येथे विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन, समाधान शिबिराचा समारोप झाला. मागील 67 वर्षांत तुम्ही जे केल नाही ते आम्ही केवळ साडेतीन वर्षांत करून दाखविले आहे. हिंमत असेल तर एका मंचावर या, आम्ही आमची कामे मांडू, तुम्ही तुमच्या काळातील कामे मांडा. दोघेही एकदाच हिशेब मांडू, असे खुले आव्हान फडणवीस यांनी विरोधकांना दिले. या कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे व अन्य एका युवतीने घोषणाबाजी करीत व्यासपीठाकडे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतले.

Web Title: Marathwada got water - CM