esakal | Hingoli: इसापूर धरणाचे पुन्हा तेरा दरवाजे उघडले
sakal

बोलून बातमी शोधा

इसापूर धरणा

कळमनुरी : इसापूर धरणाचे पुन्हा तेरा दरवाजे उघडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी : इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेला पाऊस व अंतर्गत असलेल्या प्रकल्प व बंधाऱ्यामधून करण्यात येत असलेले विसर्जन पाहता प्रकल्प प्रशासनाने धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी सुरू असलेल्या तीन दरवाज्यामध्ये शनिवारी (ता. दोन) दहा दरवाजे उघडून वाढ केली आहे. सद्यस्थितीत धरणाचे पाच दरवाजे एक मीटरने तर आठ दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडून पैनगंगा नदीपात्रात ८६०.८१३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

इसापूर धरणाच्या पाणी पातळीत धरणाच्या प्रचलन आराखड्यानुसार अपेक्षित पाणीसाठा जमा झाल्यानंतर मागील जवळपास वीस दिवसापासून धरणांमध्ये येणाऱ्या अतिरिक्त पाण्याची आवक पाहून विसर्ग करण्यात येत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी झालेल्या पाऊस व पेण टाकळी व जयपूर बंधाऱ्यामधून करण्यात येणारा विसर्ग कमी झाल्यामुळे इसापूर प्रकल्प प्रशासनाने शुक्रवारी (ता. एक) धरणामधून करण्यात येणारा विसर्ग कमी केला होता. त्यासाठी धरणाचे सुरू असलेले दरवाजे टप्प्याटप्प्याने बंद करून केवळ तीन दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडे ठेवून पाण्याचा विसर्ग चालविला होता.

हेही वाचा: बीड : काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशन धान्याचा टेम्पो नागरिकांनीच पकडला

दरम्यान, शुक्रवारच्या रात्री धरणाच्या पाणलोट क्षेत्र अंतर्गत असलेल्या पेनटाकळी, साखरखेर्डा, मेहकर, डोणगाव, रिसोड, गोवर्धन, शिरपुर, गोरेगाव, अनसिंग, सिरसम, खंडाळा, इसापूर या भागात पावसाने हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पाऊस व अंतर्गत असलेल्या पेण टाकळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या प्रकल्पामधून व जयपूर बंधाऱ्यामधून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग थेट इसापूर धरणाच्या जलाशयात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत परत एकदा मोठी वाढ झाली आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहून प्रकल्प प्रशासनाने शनिवारी पाण्याचा विसर्ग सोडला आहे.

loading image
go to top