Marathwada_mukti_sangram_din : रेल्वेला अडथळ्यांचा मार्ग

अनिल जमधडे
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

प्रदीर्घ लढ्यानंतरही मराठवाड्यातील रेल्वे प्रश्‍नांकडे दुर्लक्ष 

औरंगाबाद - सत्तर वर्षांपासून मराठवाड्याच्या रेल्वे विकासाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वेळोवेळी आंदोलने करूनही रेल्वेचे प्रश्‍न सुटत नाहीत. संपूर्ण देशभर रेल्वेचा विकास होत असताना मराठवाड्याच्या वाट्याला मात्र उपेक्षाच आहे. दुहेरी मार्ग आणि इलेक्‍ट्रिफिकेशनच्या महत्त्वाच्या प्रश्‍नासह अनेक प्रश्‍न रखडल्याने रेल्वेच्या विकासाच्या मार्गाचे अडथळे आजही कायम आहेत. 

दक्षिण मध्य रेल्वेच्या सापत्न वागणुकीचा मराठवाड्याला कायमच फटका बसत आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानंतर सर्वाधिक म्हणजे वर्षभरात 73 कोटी रुपयांची कमाई करणारे रेल्वेस्थानक म्हणून औरंगाबादचा क्रमांक लागतो. मराठवाड्याची राजधानी आणि पर्यटनाची राजधानी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या या शहराच्या रेल्वे विकासाकडे लक्ष देण्याची गरज रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रशासनाला वाटत नाही. 
 
मराठवाड्यातील आंदोलने 
मराठवाड्यात रेल्वेचा विकास व्हावा, रेल्वेचे जाळे विकसित करावे, यासाठी त्यावेळी म्हणजे 1960 ते 1975 च्या काळात अनेक आंदोलने झाली. 1964 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या उपस्थितीत मराठवाडा जनता विकास परिषदेच्या झालेल्या अधिवेशनात रेल्वे रुंदीकरण आणि नवीन रेल्वेमार्गाची आग्रही मागणी करण्यात आली होती. त्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद मार्गाची तसेच मनमाड-मुदखेड रुंदीकरणाची मागणी होती. त्यानंतर 1966 मध्ये गोविंदभाई श्रॉफ यांच्या उपस्थितीत अधिवेशन झाले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही हजेरी लावली होती. नाईक यांच्या काळात रेल्वेचा विकास आराखडाही तयार करण्यात आला होता. ऐंशीच्या दशकात गोविंदभाई श्रॉफ व व्ही. डी. देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली "मराठवाडा बंद' ठेवण्यात आला होता. त्या काळात विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते व नागरिकांच्या उत्स्फूर्त आंदोलनानंतर सुरवातीला मीटरगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यासाठी आंदोलने झाली. 1993 मध्ये मनमाड-औरंगाबाद व त्यानंतर 1999 पर्यंत नांदेड, पुढे मुदखेडपर्यंत रेल्वेमार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. त्यानंतर मात्र रेल्वेमार्गाच्या विकासाला खीळ बसली, ती आजही कायम आहे. गेल्या 32 वर्षांपासून रेल्वेच्या प्रश्‍नांसाठी विविध पक्ष, संघटना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा हे निकराने लढा देत आहेत. विविध पातळींवर अनेक नेते, कार्यकर्ते सातत्याने आंदोलने करीत आहेत. मागण्यांची निवेदने देत आहेत. तरीही महत्त्वाचे प्रश्‍न मात्र अद्यापही कायमच आहेत. 
 
काय आहेत प्रश्‍न... 
 

  • औरंगाबादमध्ये पीटलाइन तयार करावी. 
  • नांदेड विभाग मध्य रेल्वेशी जोडावा 
  • मनमाड ते मुदखेड रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करावे. 
  • रेल्वेमार्गावर इलेक्‍ट्रिफिकेशन करावे. 
  • रोटेगाव ते कोपरगाव रेल्वेमार्गासाठी निधी द्यावा 
  • मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर हा नवा मार्ग पूर्ण करावा 
  • औरंगाबाद-दौलताबाद-कन्नड-चाळीसगाव हा मार्ग पूर्ण करावा 
  • नांदेड-मुंबई रेल्वे सुरू करावी 
  • पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद-अजमेर-जयपूर, 
  • औरंगाबाद-जोधपूर, उदयपूर, बंगळुरूसह मुंबई व दिल्लीसाठी रेल्वे सुरू कराव्यात 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada mukti sangram din Vishesh