Video- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल अमुल्य- वर्षा गायकवाड

राजेश दारव्हेकर
Thursday, 17 September 2020

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजवंदन समारंभ प्रसंगी गुरुवारी ता. १७  पालकमंत्री बोलत होत्या.

हिंगोली :  मराठवाडा मुक्ती संग्रामाकरीता आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या महान हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने अखंड लढा दिला त्या लढ्याचे मोल अमूल्य असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजवंदन समारंभ प्रसंगी गुरुवारी ता. १७  पालकमंत्री बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, आमदार तान्हाजी मुटकुळे,  नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधिक्षक यागेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची गरुडभरारी
 

५७५ संस्थानांपैकी ५६२ संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली होती

यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होता. तेंव्हा मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यात आला होता. त्यावेळी देशात असलेल्या ५७५ संस्थानांपैकी ५६२ संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली होती. परंतू हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला होता. मराठवाड्याच्या गावा-गावातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने लढला.

हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल फार मोठे आहे

तरीही सुध्दा निजाम शरण येत नसल्याचे पाहून भारत सरकारने पोलीस ॲक्शन सुरु केली. मराठवाडा मुक्ती संग्रामचे हे आंदोलन सतत १३ महिने सुरु होते. अखेर १७  सप्टेंबर, १९४८  रोजी निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करून भारतीय संघराज्यात विलीन झाला. मराठवाडा मुक्ती संग्रामाकरीता अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे मोल फार मोठे आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला, तो सुवर्णाक्षरांनी लिहावा असे सांगत या त्यागाची जाणीव ठेवूनच मराठवाड्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतीक व कृषि विषयक सर्वांगीण विकासाकरिता सर्वांचे सहकार्याची गरज आहे, असे पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेस सुरुवात

तसेच कोरोना विरुद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळविण्याचे राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सांगुन प्रा. गायकवाड म्हणाल्या की, राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्याने हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येत आहे. परंतु जनतेमध्ये कोरोनाची भीती कमी होत असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. याकरीता कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी, तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवून त्यांना आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्यात १५ सप्टेंबरपासून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेस सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

येथे क्लिक करामराठवाडा (हैदराबाद) मुक्तीसंग्रामाचा दैदिप्यमान लढा...

त्रिसूत्रीचे पालन करुनच आपणां सर्वांना कोरोनापासून सुरक्षित राहता येणार आहे.

या मोहिमेकरीता आरोग्य विभागामार्फत पथके नेमण्यात आली असून ही पथके महिनाभरात किमान दोन वेळा सर्व कुटूंबांपर्यंत पोहोचणार असुन, दररोज ५० घरांना भेट देवून कुटूंबातील सदस्यांची आरोग्यविषयक तपासणी करुन आवश्यकता असल्यास पुढील उपचार देण्यात येणार आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वसंरक्षण महत्वाचे असून प्रत्येकाने आरोग्यविषयक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेत मुखपट्टी लावणे, सुरक्षित अंतर राखणे व हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन करुनच आपणां सर्वांना कोरोनापासून सुरक्षित राहता येणार आहे. 

हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना

प्रारंभी पालकमंत्री प्रा. श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन  हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी  उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) गोविंद रणवीरकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर, तहसिलदार गजानन शिंदे, यांच्यासह मान्यवरांची  उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada Muktisangram Day: The value of the struggle given by martyrs and freedom fighters is invaluable Varsha Gaikwad hingoli news