गल्ली ते दिल्ली भाजप पण, नळेगावच्या माथी ‘बुरे दिन’च!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नळेगाव - येथील पाणी, रस्त्याची समस्या कायम असून लोकप्रतिनिधींची निवडणुकीतील आश्वासने हवेत विरली आहेत.

नळेगाव - येथील पाणी, रस्त्याची समस्या कायम असून लोकप्रतिनिधींची निवडणुकीतील आश्वासने हवेत विरली आहेत.

सध्या केंद्र, राज्यात भाजपचे सरकार आहे. या भागाचे खासदार, आमदार भाजपचे आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपची सत्ता, नळेगाव गटात व गणात भाजपच्या सदस्या आहेत. गणापासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. सत्ता बदलानंतर नळेगाव परिसराचा विकास होऊन परिसरातील जनतेला अच्छे दिन येतील वाटत होते; पण प्रत्यक्षात तसे काही घडतच नाही. भागातील पाणी, रस्त्याच्या समस्या कायम आहेत. येथील घरणी मध्यम प्रकल्पावरील शिवपूर नऊ खेडी पाणीपुरवठा योजनेतून नळेगाव गटातील नळेगाव, लिंबाळवाडी, देवंग्रा व सुगाव या गावांना पाणीपुरवठा केला जातो. थकीत वीज बिलामुळे सतत वीज तोडली जाते. घरणी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागाची पाण्याची समस्या कायम आहे; मात्र लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. 

परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने अनेक तालुक्‍यांचा संपर्क येतो. खराब रस्त्याची केवळ डागडुजी केली जाते, ते निकृष्ट दर्जामुळे परत खराब होतात. रस्त्याची दुरुस्ती करून त्याचा दर्जाही टिकवणे गरजेचे आहे. 

स्वच्छतागृह बांधकाम, शोषखड्डे, पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील विहिरी आदी कामे रखडली आहेत. पाण्यासाठी जनता रस्त्यावर येऊन निवेदने देण्यात येतात, मोर्चे काढले जातात; पण लोकप्रतिनिधी मात्र सत्तेत मश्‍गुल आहेत. पाणी प्रश्‍नाकडे कोणी पाहतच नाही. प्रत्येक निवडणुकीत आश्‍वासनांची खैरात वाटण्यात आली होती; पण असे काही होतच नाही. विकासकामे सोडा मूलभूत सुविधाही मिळत नाहीत.

Web Title: marathwada news bjp