तांड्यावरची डॉक्‍टर करणार अमेरिकेत मार्गदर्शन

कमलेश जाब्रस  
रविवार, 11 मार्च 2018

माजलगाव - अमेरिकेत १५ ते २० मार्चच्या दरम्यान होणाऱ्या जागतिक आरोग्य परिषदेमध्ये राजेगावजवळच्या बाराभाई तांड्यावरील (ता. माजलगाव) डॉ. राधिका चव्हाण सहभागी होणार आहेत. अत्यंत कमी वयात जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली असून, भारतातून त्या एकमेव महिला डॉक्‍टर असतील. या परिषदेत त्या विविध देशांतील डॉक्‍टरांना ‘महिलांच्या आरोग्यविषयक समस्या व सुधारणा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. 

बाराभाई तांडा हे एक हजार लोकसंख्येचे गाव. तेथील जगन्नाथ रामभाऊ चव्हाण यांची राधिका ही द्वितीय कन्या. जिल्हा परिषदेच्या तांड्यावरील शाळेत राधिका यांचे प्राथमिक, शहरातील महात्मा फुले विद्यालयात माध्यमिक तर सोळंके महाविद्यालयात पुढील शिक्षण झाले. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’ तर मुंबईतील के. ई. एम. महाविद्यालयात एम. डी. (मेडिसीन) केले. हैदराबादमध्ये सुपर स्पेशलायझेशन करीत असताना देशातून द्वितीय येण्याचा मान त्यांनी मिळविला. आता त्यांना अमेरिकेतील जागतिक आरोग्य परिषदेत सहभागाची संधी मिळाली आहे. ‘महिलांच्या आरोग्यविषयक सुधारणा’ हा परिषदेचा उद्देश असून ‘पोट आणि पोटाचे विकार’ या विषयावर डॉ. चव्हाण मार्गदर्शन करतील. परिषदेसाठी भारताची एकमेव प्रतिनिधी म्हणून त्यांची नुकतीच निवड झाली. परिषदेत अमेरिकेसह जपान, जर्मनी, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, इंग्लंड, व्हियतनाम आदी देशांतील डॉक्‍टर सहभागी होणार असून, त्यांना डॉ. चव्हाण मार्गदर्शन करतील.

बहीणही डॉक्‍टर
डॉ. राधिका चव्हाण यांचे वडील एस. टी. महामंडळातून निवृत्त झाले आहेत. आई रुक्‍मीणबाई अंगणवाडी ताई म्हणून कार्यरत आहेत. बहीण डॉ. मीना चव्हाण या हिमाचल प्रदेशात जागतिक आरोग्य संघटना कार्यालयात प्रादेशिक अधिकारी आहेत, तर भाऊ अविनाश हा पुण्यात ‘एम. फार्मसी’ करीत आहे.  

ग्रामीण भागातील तांड्यासारख्या भागात राहून जिद्दीने उच्च शिक्षण घेतले. आता भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. आईवडिलांचे सहकार्य, तमाम गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाले. सध्याच्या स्पर्धेच्या युगात वावरताना तरुणांनी आपण ग्रामीण भागातील आहोत, असा न्यूनगंड ठेवू नये. अडचणींवर मात करून शिक्षण घ्यावे, संधी चालून येते.
- डॉ. राधिका चव्हाण

Web Title: marathwada news Dr. radhika chavan World Health Council majalgaon