विहिरीचे खोदकाम करताना सापडले मौल्यवान चकाकणारे दगड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

सिल्लोड - शिवना (ता. सिल्लोड) परिसरातील शेतीमध्ये विहिरीचे खोदकाम करीत असताना आकर्षक चकाकणारे दगड मिळाले आहेत. पाच-सहा दिवसांपासून दलालांमार्फत या दगडांची गुपचूप लाखो रुपयांना विक्री केली जात असल्याची चर्चा परिसरात आहे. गौण खनिजाचा साठा ही शासनाची मालमत्ता असून, या प्रकरणी मात्र स्वामित्व धनाबाबत प्रशासनाने चुप्पी साधली आहे. या प्रकरणी कोणीही बोलण्यास तयार नाही.

सिल्लोड - शिवना (ता. सिल्लोड) परिसरातील शेतीमध्ये विहिरीचे खोदकाम करीत असताना आकर्षक चकाकणारे दगड मिळाले आहेत. पाच-सहा दिवसांपासून दलालांमार्फत या दगडांची गुपचूप लाखो रुपयांना विक्री केली जात असल्याची चर्चा परिसरात आहे. गौण खनिजाचा साठा ही शासनाची मालमत्ता असून, या प्रकरणी मात्र स्वामित्व धनाबाबत प्रशासनाने चुप्पी साधली आहे. या प्रकरणी कोणीही बोलण्यास तयार नाही.

या चकाकणाऱ्या दगडांची छुप्या पद्धतीने विक्री होत असून, हा व्यवहार दिवसाऐवजी रात्री जोरात सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. दलालांमार्फत शिवना परिसरातील काही मोठ्या व्यक्ती यामध्ये रस घेऊन चढ्या दराने याची विक्री करीत आहेत. लाखो रुपयांच्या स्वामित्व धनाची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. 

शिवना येथील कौशल्याबाई एकनाथ काळे यांच्या शिवना परिसरातील गट क्रमांक ८४४ मध्ये विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. साधारण चाळीस फुटांपर्यंत विहिरीचे खोदकाम झाल्यानंतर रविवारी (ता. चार) या खोदकामामध्ये पिवळसर बदामी रंग असलेले पाणीदार दगड आढळून आले; परंतु संबंधित शेतकऱ्यास हा कोणत्या प्रकारचा दगड आहे, याची माहिती नसल्यामुळे त्यांनी ही घटना नजरेआड केली; परंतु अजिंठा परिसरात काम करणाऱ्यांना याची माहिती मिळताच या विहिरीवर गर्दी वाढू लागली. मिळालेल्या चकाकणाऱ्या मौल्यवान दगडांची खरेदी करण्यासाठी बोली लागू लागली. याची माहिती महसूल व अजिंठा पोलिसांकडे गेल्यानंतर या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांनी झिरो पोलिसांचा पहारा बसविला. यानंतर महसूल, पोलिस व दलालांच्या माध्यमातून याचा रोज छुप्या पद्धतीने लिलाव करून लाखो रुपयांची उलाढाल मध्यरात्रीच होत आहे. या प्रकाराबद्दल मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात येत असली, तरी आता याची चर्चा जोरात सुरू आहे. 

या प्रकरणी सिल्लोडचे परिविक्षाधीन तहसीलदार सौरभ कटियार यांच्याशी गुरुवारी (ता. आठ) संपर्क साधला असता, मला या प्रकाराबद्दल काही माहिती नाही, माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी मंडळ अधिकारी एम. जी. काझी, शिवना सजाचे तलाठी डी. जी. जरारे यांनी विहिरीवर जाऊन पंचनामा केला. मात्र, पंचनाम्यात विहिरीमध्ये कुठल्याही प्रकारचे स्वामित्व धन आढळून आले नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पंचनाम्यावर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अरुण काळे, अमोल काळे, हरी किसन, प्रतीक जोशी व शेख रिजवान यांच्या पंच म्हणून स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.

आळा घालणे आवश्‍यक
अजिंठा लेणीसह व्ह्यू पॉइंटच्या परिसरात स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणात मौल्यवान दगड, गारगोटीच्या शिल्पांची विक्री करण्याचा  व्यवसाय करतात. यावर त्यांची उपजीविका सुरू आहे; मात्र विहिरीमध्ये आढळून आलेल्या चकाकणारे दगडांची चोरटी विक्री करण्याचा गोरखधंदा जर दलालांमार्फत होत असेल तर त्यास आळा घालणे आवश्‍यक आहे.

Web Title: marathwada news precious glittering stone