स्कूल बसचा धोकादायक प्रवास सुरूच

अनिल जमधडे 
गुरुवार, 20 जुलै 2017

शाळेच्या मुलांना ने-आण करणाऱ्या स्कूल बससाठी नियमावली तयार करण्यात आलेली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या काळजीचा भाग म्हणून स्कूल बस समित्याही स्थापन केलेल्या आहेत. स्कूल बसची नियमाप्रमाणे काटेकोर तपासणी झाल्यानंतरच ती रस्त्यावर चालणे आवश्‍यक आहे. यासाठी परिवहन विभागाने तपासणीची विशेष मोहीम घेऊनही अद्याप संपूर्ण बसची तपासणी होऊ शकली नाही. स्कूल बस समित्यांचा कारभारही कागदावर आहे. एकूणच स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन होत नाही. हा सर्व प्रकार मुलांच्या जीविताशी खेळण्यासारखाच आहे.  

स्कूल बसचे अपघात होऊ नयेत, म्हणून स्कूल बसच्या तपासणीकडे परिवहन विभागाने अधिक लक्ष देऊन नियमावली तयार केलेली आहे. प्रत्येक वर्षी स्कूल बसची परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करूनच ते वाहन रस्त्यावर चालविणे आवश्‍यक आहे. वर्षभर व्यस्त असलेली स्कूल बस उन्हाळ्याच्या सुटीमध्ये रिकामी राहते, म्हणून या काळात स्कूल बसची तपासणी करून घेण्यासाठी परिवहन विभागाने संपूर्ण राज्यभर मोहीम सुरू केली होती. प्रत्येक शाळेत जाऊन बसची फिटनेस तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली होती; मात्र सुटीच्या काळात स्कूल बसचालकांनी आपली वाहने विवाह समारंभ व अन्य कारणांसाठी भाड्याने दिल्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

औरंगाबाद शहरामध्ये एक हजार ९० स्कूल बस आहेत. त्यामध्ये ३५४ बसगाड्या नवीन आहेत. मे महिन्यात स्कूल बसची तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले होते; मात्र मे महिना उलटूनही अनेक वाहनांची तपासणी झाली नाही, म्हणून ही मुदत १५ जूनपर्यंत वाढवून देण्यात आली होती. त्यानंतरही स्कूल बसची तपासणी करून घेण्यात टाळाटाळ होत असल्याने १५ जूननंतर थेट तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. आरटीओच्या अधिकाऱ्यांनी या काळात जवळपास पाचशे स्कूल बसची तपासणी करून, शंभर बसची जप्ती केली. या कारवाईतून, परिवहन कार्यालयाने सहा लाख रुपयांची दंडात्मक वसुली केली. असे असले तरीही अद्याप दोनशे ते तीनशे स्कूल बसची तपासणी झालेली नाही. या स्कूल बसवर कारवाई करण्यात येणार आहे. आरटीओ कार्यालयाकडून वारंवार आवाहन करूनही शाळेच्या व्यवस्थापनातर्फे किंवा स्कूल बसचालकांतर्फे बसची तपासणी करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याने पुन्हा एकदा धडक कारवाई करण्याची परिवहन विभागाची तयारी सुरू झाली आहे. मुळात शाळेच्या मुलांच्या वाहतुकीची काळजी घेणे ही शाळा प्रशासनाची, स्कूल बस समितीची जबाबदारी आहे; मात्र कुठल्याही शाळेत स्कूल बस समित्या कार्यरत नाहीत किंवा असूनही त्या निष्क्रिय आहेत. या समितीची शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रत्येक महिन्याला बैठक घेणे, या बैठकीला परिवहन निरीक्षकांनी जाणे आवश्‍यक आहे. प्रत्यक्षात मुख्याध्यापक बैठका घेत नाहीत. त्यामुळे निरीक्षकही बैठकीला जात नाहीत. स्कूल बस समित्याच कार्यरत नसल्याने बसचा धोकादायक प्रवास बिनदिक्कत सुरूच आहे.

Web Title: marathwada news school bus dangerous journey