राक्षसभुवनातील शनी, पांचाळेश्वर दत्त मंदिर पाण्यात, साडेतीन शक्ती पिठापैकी एका मंदिराचा समावेश

वैजिनाथ जाधव
Wednesday, 9 September 2020

गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्याने गेवराई तालुक्यातील साडे तीन पिठापैकी एक असलेल्या राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर पाण्यात गेली आहे. त्याचबरोबर नदीकाठचे सर्वच मंदिरांमध्ये पाणी साचले आहे. 

गेवराई (बीड) : पैठण येथील जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे उघडून गोदावरी पात्रात पंधरा हजार दोनसे तेरा क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान नगर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून तेथील धरणे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु झाली आहे. गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्याने तालुक्यातील साडे तीन पिठापैकी एक असलेल्या राक्षसभुवन येथील शनि महाराज यांची मुर्ती पाण्यात गेली आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

गोदावरीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गेवराई तालुक्यातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तालुक्यातील पांचाळेश्वर येथील दत्त मंदिर, श्री क्षेत्र राक्षसभुवन येथील शनी मंदिर यांना पाण्याचा वेढा पडला आहे. यामुळे येथील मूर्ती पाण्याखाली गेल्या आहेत. पांचाळेश्वर येथील दत्त मंदिर पूर्ण पाण्याखाली गेले आहे. तसेच सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग पाहता तालुक्यातील गोदाकाठच्या बत्तीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गोदाकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रात जाऊ नये, आपली काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महसूल प्रशासन गावकऱ्यांच्या संपर्कात असून चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गोदाकाठच्या बत्तीस गावातील नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी गेवराई महसुलच्या वतीने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला. गावकऱ्यांना पूराबाबत किंवा इतर काही समस्या उदभवल्यास या ग्रुपवर मेसेज केल्यास लगेच महसूल पथक मदतीसाठी सज्ज असणार आहे. यासाठी तलाठी, मंडळाधिकारी आदी कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आल्याची माहिती प्रभारी तहसीलदार सुहास हजारे यांनी दिली.

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada rainfall Temple Entry Water