esakal | Marathwada: परतीच्या पावसाच्या भितीने गंजीतील सोयाबिनच्या राशी सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबिनच्या राशी सुरु

उमरगा : परतीच्या पावसाच्या भितीने गंजीतील सोयाबिनच्या राशी सुरु

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : गेल्या आठ - दहा दिवसात झालेल्या पावसाने ऐन काढणीसाठी आलेल्या सोयाबिनचे नुकसान केले आहे, बहुतांश क्षेत्रातील सोयाबिन पाण्यात असल्याने काढणीसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. दरम्यान पावसाच्या भितीने आठ दिवसापूर्वी लगभगीने जमेल तेवढे काढून ठेवलेल्या सोयाबिनच्या राशी कांही मोजक्या ठिकाणी सुरु आहेत. मात्र उतारा मार खाल्ल्याने शेतकरी हतबल होत आहेत.

उमरगा तालुक्यात खरिप पेरणीचे क्षेत्र अधिक असते. त्यात प्रामुख्याने तूर, उडीद, मूग व संकरित ज्वारीचे क्षेत्र असायचे आता गेल्या पाच - सहा वर्षापासुन सोयाबिनचे क्षेत्र वाढले आहे. यंदा जुन महिन्यात पाऊस वेळेवर झाला नसल्याने पेरण्याला विलंब झाला, त्यानंतर मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने मूग, उडीद व सोयाबिनच्या वाढीला आवश्यक ते पोषक वातावरण मिळाले नाही ; तरीही बऱ्याच शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या आधारावर पिके जगवली त्यात पुन्हा अळ्या, किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने फळधारणेत विघ्न आले. त्यात भयंकर विघ्न ऐन काढणीच्या अवस्थेत आले, पावसाच्या तडाख्याने सोयाबिनचे क्षेत्र पाण्यात गेले. रानात चिखल आहे, शेंगा मातीत गेल्या आहेत, अशा स्थितीत काढणीचा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यातुन शिल्लक दाम रहाण्याची शक्यता दिसत नाही.

हेही वाचा: Mumbai Drug Case: खरा रिपोर्ट समोर येऊ द्या! अभिनेता सुनील शेट्टीचं व्टिट

दरातील चढ, उताराने शेतकऱ्यांना होतोय मनस्ताप !

शेतकऱ्यांनी सोयाबिनच्या केलेल्या मेहनतीप्रमाणे व आर्थिक खर्चानुसार प्रतिक्विंटल दर अधिक मिळायला हवा. पण दरातील चढ, उताराने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. दरम्यान सर्वाधिक क्षेत्र असेलल्या सोयाबिनच्या वाढीसाठी शेतकऱ्यांनी मोठी मेहनत घेतली आहे, रोगराई नष्ट करण्यासाठी आर्थिक कष्ट घ्यावे लागले. बहुतांश क्षेत्रात सोयाबिन काढणीसाठी आले आहे. अधिक भाव मिळण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अधिक खर्च, मेहनत घेतली आहे, पंधरा दिवसापूर्वी सोयाबीनला नऊ हजार प्रतिक्विंटल दर मिळाल्याची चर्चा झाली. पण तो काळ मर्यादित ठरला. अडत बाजारात आवक सुरु झाल्यानंतर दरात चढ, उतार सुरू झाली. पाच हजार सहा हजार (प्रति क्विंटल) दर मिळतोय, त्यात उताराही कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत असल्याचे मत उमरग्यातील शेतकरी आकाश काळे यांनी व्यक्त केले.

दरम्यान ऐन काढणीत होणाऱ्या पावसाच्या भितीने कांही मोजक्या शेतकऱ्यांनी आठ दिवसापूर्वीच सोयाबिनची काढणी केली, आणि गंजी उभ्या केल्या, आता त्याच उन्हात ठेवुन कांही ठिकाणी राशी सुरु झाल्या आहेत. एकरी दहा ते बारा गट्टे उतारा मिळत आहे. बऱ्याच क्षेत्रात पाण्यात अडकलेले सोयाबिन काढणीसाठी येणारा खर्च अधिक मागितला जातोय, पण प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न कमी होणार असल्याने शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागत आहे. चिखलामुळे मळणी यंत्र, टॅक्टर शेतापर्यंत जात नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या शिवारातील राशीचा प्रश्न अडचणीचा ठरत आहे.

परतीच्या पावसाचा धसका !

कांही सुरक्षित ठेवलेल्या सोयाबीनच्या राशी सुरू असल्या तरी बहुतांश क्षेत्रातील सोयाबिनच्या क्षेत्रात साचलेल्या पाण्याने शेतकऱ्यांच्या डोळ्याच्या कडा ओल्या होत आहेत, त्याची कशी तरी विल्हेवाट लावण्यासाठी उठाठेव सुरु आहे, त्यात पुन्हा परतीच्या पावसाचा व्यक्त केला जाणारा अंदाज खरा ठरला कि, सोयाबिनच्या उत्पन्नाच्या बाबतीत ठरलेलं भाकित खोटं ठरेल आणि शेतकऱ्यांच्या नशीबी पालापाचोळाचं राहिल.

loading image
go to top