सत्ताकेंद्र असूनही मराठवाडा मागे : निलंगेकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

‘‘राज्याचे सत्ताकेंद्र लातूर, नांदेड, उस्मानाबाद येथे असताना मराठवाडा मागे का राहिला? याचा अर्थ त्यावेळचे नेतृत्व कमी पडले आणि ते वेळोवेळी चुकत गेले,’’ अशा शब्दांत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी काँग्रेस नेत्यांवर तोफ डागली.

लातूर : ‘‘राज्याचे सत्ताकेंद्र लातूर, नांदेड, उस्मानाबाद येथे असताना मराठवाडा मागे का राहिला? याचा अर्थ त्यावेळचे नेतृत्व कमी पडले आणि ते वेळोवेळी चुकत गेले,’’ अशा शब्दांत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी काँग्रेस नेत्यांवर तोफ डागली. मी कोणा एकावर टीका करत नाही. यात आमच्या आजोबांचाही (माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर) समावेश आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध संस्था-संघटनांच्या वतीने आयोजित मराठवाडा विकास परिषदेचे उद्‌घाटन निलंगेकर यांच्या हस्ते शनिवारी झाले. या वेळी जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, महापौर सुरेश पवार, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, आमदार सुरजितसिंह ठाकूर, आमदार प्रशांत बंब, आमदार विनायकराव पाटील, आमदार सुभाष साबने, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, माजी खासदार गोपाळराव पाटील, समाजवादी नेते मनोहर गोमारे, आयोजक शिवाजीराव पाटील कव्हेकर उपस्थित होते.

निलंगेकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी निधी पळवून नेला, खेचून नेला. त्यामुळे मराठवाड्याचा अनुशेष वाढत गेला, अशी ओरड वारंवार केली जाते, पण मला तसे वाटत नाही. तिकडच्या नेत्यांनी त्यांचे काम केले. मात्र, मोठमोठी पदे भूषवलेले आमचे नेते यात कमी पडले. याचाही आपण विचार करायला हवा. मराठवाड्याच्या प्रश्नांसंदर्भात सर्वांनी एकत्र यायला हवे. कोण कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या गटाचा आहे याचा विचार न करता पश्चिम महाराष्ट्रातील नेते विकासासाठी नेहमी एकत्र येतात. तसे चित्र आपल्याकडेही निर्माण व्हायला हवे.

पाणी कोणत्या दिशेला जातेय?

माझी काही अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू होती. त्यात सर्वांत कमी पाऊस पडणारे आणि सर्वांत जास्त टँकर चालू असलेले राज्यातील पाच जिल्ह्यांची यादी काढायला सांगितली होती. त्यावेळी त्या यादीत लातूरचे नाव होते. त्यानंतर सर्वांत जास्त साखर कारखाने असलेल्या जिल्ह्याची यादी काढायला सांगितली. त्यातही लातूरचे नाव होते. आता या विषयावर मी जास्त बोललो तर ‘हा राजकारण करत आहे’ अशी टीका माझ्यावर होईल, पण आपले पाणी नेमके कोठे आणि कोणत्या दिशेला जात आहे, हे स्पष्ट होत आहे, अशा शब्दांत निलंगेकर यांनी काँग्रेसवर टीका केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada is under developed despite being the power center says Nilangekar