जलतरण तलावाला पाण्याची प्रतीक्षा! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

औरंगाबाद - दशकभरापासून बंद असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाच्या जलतरण तलावाला आता केवळ पाण्याची प्रतीक्षा आहे. 70 लाख रुपये खर्च करून या जलतरण तलावाच्या डागडुजीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. महापालिकेकडून वेळेत पाणी मिळाल्यास हा तलाव यंदा जलतरणप्रेमींसाठी खुला होऊ शकतो. 

औरंगाबाद - दशकभरापासून बंद असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाच्या जलतरण तलावाला आता केवळ पाण्याची प्रतीक्षा आहे. 70 लाख रुपये खर्च करून या जलतरण तलावाच्या डागडुजीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. महापालिकेकडून वेळेत पाणी मिळाल्यास हा तलाव यंदा जलतरणप्रेमींसाठी खुला होऊ शकतो. 

शहरातील जुन्या जलतरण तलावांपैकी एक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागातील तलाव खराब झाला होता. सत्तर लाख रुपये खर्चून या तलावाच्या डागडुजीस सुमारे तीन वर्षांपूर्वी सुरवात करण्यात आली होती. यातील निम्मी रक्कम ही जलतरण तलावाच्या नव्या फिल्टरेशन प्लांटवर खर्च करण्यात आली. त्यानंतर जुन्या झालेल्या या जलतरण तलावाचे आयुष्य वाढविण्यासाठी आणि त्याला नवा चेहरा देण्यासाठी डागडुजीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यात स्नानगृहे, चेंजिंग रूम, प्रशिक्षकांसाठी एक स्वतंत्र दालन, ड्रेनेज सिस्टीममची डागडुजी करणे, बसण्यासाठी चांगली जागा तयार करणे अशी या कामांची लांबलचक यादी आहे. या कामांच्या मंजुरीसाठी राजभवनात गेलेली फाईल परतल्यावर कामांना गती आली. बांधकाम आणि अन्य मोठी कामे आता पूर्ण झाली असून, रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. तलाव जलतरणप्रेमींच्या स्वागताला सज्ज झाला आहे. कामे आता पूर्णत्वास आली असल्याने विद्यापीठाच्या मालमत्ता विभागाने महापालिकेला पत्र लिहून पाण्याची मागणी केली आहे. पाणी वेळेवर उपलब्ध झाले तर शहरातील जलतरणप्रेमींना आणि जलतरणपटूंना यंदा फायदा घेता येणार आहे. 

जलतरण तलावाचे काम 70 लाख रुपये खर्चून पूर्ण करण्यात आले आहे. या तलावाला पाणी मिळावे म्हणून महापालिकेला पत्र देण्यात आले आहे. पाणी वेळेत मिळाले तर शहरातील जलतरणप्रेमी आणि जलतरणपटूंची सोय होईल. 
- डॉ. प्रदीप दुबे, संचालक, क्रीडा विभाग. 

Web Title: marathwada univercity water level