मराठवाडा-विदर्भात निर्माण व्हावे डाळींचे निर्यातक्षेत्र - नानासाहेब पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

औरंगाबाद - 'सातत्याने दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात कडधान्यांचे पीक चांगले आहे. यंदा पावसामुळे तूर, उडीद आणि मुगाचे उत्पादन वाढलेले आहे. मात्र, त्यासाठी स्पष्ट खरेदी धोरण उपलब्ध नाही. या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी कॅनडाच्या धर्तीवर विशेष निर्यात झोन निर्माण झाले पाहिजेत,'' अशी अपेक्षा निवृत्त कृषी सचिव नानासाहेब पाटील यांनी व्यक्‍त केली.

औरंगाबाद - 'सातत्याने दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात कडधान्यांचे पीक चांगले आहे. यंदा पावसामुळे तूर, उडीद आणि मुगाचे उत्पादन वाढलेले आहे. मात्र, त्यासाठी स्पष्ट खरेदी धोरण उपलब्ध नाही. या पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी कॅनडाच्या धर्तीवर विशेष निर्यात झोन निर्माण झाले पाहिजेत,'' अशी अपेक्षा निवृत्त कृषी सचिव नानासाहेब पाटील यांनी व्यक्‍त केली.

कृषी विभागातर्फे अयोध्यानगरच्या मैदानावर 24 ते 27 डिसेंबरदरम्यान आयोजित राज्यस्तरीय महाऍग्रो-2016 कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटक म्हणून शनिवारी (ता. 24) ते बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, 'नॅशनल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून वर्ष 2004 मध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज निर्माण करण्यात आले. त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भाचा प्रामुख्याने डाळींच्या बाबतीत उल्लेख झाला. त्यानंतर लगेचच नॅशनल पल्सेस मिशन राबविण्यात आले. मात्र, ते आता मागे पडले किंवा मागे पाडले जात आहे. दुसरीकडे एका खात्याचे जबाबदार मंत्री ब्राझीलमध्ये कडधान्य पिकविले पाहिजे, असे सांगतात. त्याएवेजी ते वाया जाणारे परकीय चलन शेतकऱ्यांवर खर्च केल्यास अधिक फायदा होईल. याचाच अर्थ सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहत नाही. आता देशातील कृषी परिस्थिती सुधारावयाची असल्यास कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीचा दर वाढविणे, कोरडवाहू शेतीकडे अधिक लक्ष देणे आणि मार्केटिंग ऍक्‍ट अस्तित्वात आणणे या त्रिसूत्रीवर मोठ्या प्रमाणात काम व्हायला हवे.

केंद्र सरकारने नुकताच गहू आयातीवरील बंदी हटविण्याचा घातकी निर्णय घेतला. त्यामुळे ज्या पंजाब आणि हरयाणा राज्यांनी गव्हाच्या बाबतीत देशाला स्वावलंबी केले, त्या राज्यांतील शेतकऱ्यांना ठार मारण्याचे धोरण आहे. 125 कोटीच्या देशातील 52 टक्‍के लोकसंख्या कृषीवर अवलंबून आहे. मात्र, शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. सध्याचा विकास जॉबलेस सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी काय करायचे? हा प्रश्‍न टाळून जमणार नाही. त्यांच्यासाठी नोकऱ्या उपलब्ध करून द्यायला हव्यात किंवा शेतीसाठी योग्य धोरण निर्माण करायला पाहिजे. विकसित राष्ट्रेसुद्धा सबसिडीशिवाय कृषी क्षेत्रात प्रगती करू शकले नाहीत. सरकारकडे कृषीविषयक कुठल्याही प्रकारचे धोरण नाही, असा आरोपही श्री. पाटील यांनी केला.

अध्यक्षीय भाषणात आमदार संजय शिरसाट म्हणाले, की शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर उत्तर मिळो अथवा न मिळो त्यावर बोलणाऱ्यांची संख्या सभागृहात मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीसह दुसऱ्या क्षेत्राकडेही वळून कोट घालण्याच्या भूमिकेतही जावे.'' यावेळी उद्योजक रामचंद्र भोगले, प्रदर्शनाचे संयोजक ऍड. वसंत देशमुख, एस. बी. वराडे, त्र्यंबक पाथ्रीकर, विजयअण्णा बोराडे, रमेश भताने, जगन्नाथ काळे, प्रल्हाद पोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. अपर्णा अध्यापक यांनी सूत्रसंचालन केले. निशिकांत भालेराव यांनी आभार मानले.

Web Title: marathwada-vidarbha dal export field