"मार्चएंड' वसुलीमुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - ना मार्किंग, ना पार्किंग, नियमन बिघडले, वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला. पण हेल्मेट कारवाईचा बक्कळ गल्ला गोळा होत असल्याने पोलिस विभागाने "मार्चएंड' वसुलीवर जोर दिला आहे. कारवाया करा, वसुली करा, असाच आदेश पोलिस आयुक्तांकडून मिळत असल्याचे पोलिस सांगतात. परिणामी, नागरिकांशी भांडून-तांडून त्यांना कारवाया कराव्या लागत आहेत. अशा सक्तीच्या कारवाई, मनमानी व दडपशाहीमुळे सामान्यजण हवालदिल झाले आहेत. 

औरंगाबाद - ना मार्किंग, ना पार्किंग, नियमन बिघडले, वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला. पण हेल्मेट कारवाईचा बक्कळ गल्ला गोळा होत असल्याने पोलिस विभागाने "मार्चएंड' वसुलीवर जोर दिला आहे. कारवाया करा, वसुली करा, असाच आदेश पोलिस आयुक्तांकडून मिळत असल्याचे पोलिस सांगतात. परिणामी, नागरिकांशी भांडून-तांडून त्यांना कारवाया कराव्या लागत आहेत. अशा सक्तीच्या कारवाई, मनमानी व दडपशाहीमुळे सामान्यजण हवालदिल झाले आहेत. 

शासनाच्या तीन ते पाचपट दंड वसुलीच्या आदेशानंतर राज्यात कोठे नव्हे पण औरंगाबादेत मात्र, सक्तीने वाहनधारकांकडून दंडवसुली केली जात आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न केल्यास त्याच्याकडून तब्बल पाचपट अर्थात पाचशे रुपये दंड आकारला जात आहे. विद्यार्थी, महिलांसह जाळ्यात सापडेल त्याला अडवून हेल्मेट नसल्यामुळे दंडवसुली केली जात आहे. वाहतूक नियमन बाजूला ठेवून वरिष्ठांच्या आदेशामुळे पोलिस दंड वसुलीत गुंतले आहेत. पोलिस आयुक्तांनी दंड वसुलीचे टार्गेटच दिले असून भररस्त्यात, गल्लीबोळांत सापळा रचून दुचाकीस्वारांना अडविणे सुरू झाले. एवढेच नव्हे, हेल्मेट नसेल तर दुचाकीस्वारांना नागरिक म्हणून नव्हे, तर सराईत गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात आहे. सक्तीने दंड वसुली केली जात आहे. दंड न भरल्यास दुचाकीला टाळे लावून जप्तीपर्यंतच्या कारवाया पोलिस करीत आहेत. पोलिस आयुक्तांच्या अशा धोरणाविरुद्ध सर्वसामान्यांत संतापाची भावना निर्माण झाली आहे. 

 उद्दिष्ठ गाठण्याचा आटापिटा.. 
दरवर्षी मार्चएंडसाठी विविध विभाग ना-नाविध क्‍लृप्त्या शोधून त्या राबवित असतात. पोलिस विभागही या बाबतीत मागे नाही. मार्चएंड हीच एक संधी हिशेबाचा ताळेबंद जुळविण्यासाठी चालून येते. गत सहा महिन्यांत हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी थंडबस्त्यात होती. पण वसुली करून आर्थिक तूट भरून काढण्याचा सपाटा सक्तीद्वारे लावला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. 

संताप अन्‌ रोषही 
चांगला महसूल मिळवून देण्याचा फंडाच हेल्मेटच्या कारवाईत आहे. त्यामुळे दंड वसुलीत विशेष "रस' पोलिसांना आहे. गुन्हेगारांना शोधून जाळ्यात पकडले जाते त्याच पद्धतीने दुचाकीस्वारांना पकडले जात असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. पोलिसांच्या कारवाईचा अतिरेक होत असल्याने सामान्यजण संतप्त असून रोष व्यक्त करीत आहेत. 

पोलिसांची कोंडी 
एकीकडे साहेबाचा आदेश, हेल्मेटच्याच कारवाया करा, अशा सक्त सूचना आणि दिलेल्या टार्गेटमुळे पोलिसांची कसरत होत आहे. हेल्मेट नसल्यास पाचशे रुपये दंड आकारला जात आहे. पण सामान्यजणांच्या खिशात पाचशे रुपयेही नसतात. हेल्मेट नसल्यास पैसे कोठून आणणार? असा सवाल दुचाकीस्वारांतून विचार जात आहे. पोलिस मात्र कोंडीत सापडले असून टार्गेट पूर्ण करण्यातच त्यांची दमछाक होत आहे. 

Web Title: march end recovery