मकर संक्रांतीनिमित्त बाजार फुलला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

साहित्याच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी; वाहतूक झाली जाम

लातूर - महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मकर संक्रांतीचा सण शनिवारी (ता. १४) साजरा होत आहे. यानिमित्ताने लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांची शुक्रवारी (ता. १३) मोठी गर्दी राहिली. या सणानिमित्त बाजारपेठ फुलून गेली होती. मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईकडे जाणारे सर्व रस्ते जाम झाले होते. 

महिलांसाठीचा हा एक महत्त्वाचा सण आहे. गेल्या वर्षी या सणावर दुष्काळाचे सावट होते; पण यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र उत्साह आहे. त्यामुळे काही दिवसांपासून या सणाला लागणाऱ्या साहित्यांची दुकाने शहरात ठिकठिकाणी थाटली गेली होती. शुक्रवारी येथील गंजगोलाईचा सर्व परिसर, हनुमान चौक ते गंजगोलाईचा मुख्य रस्ता, सुभाष चौक, भुसार लाईन, मस्जिद रोड आदी भागांत दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती. 

येथील राजीव गांधी चौक, अंबाजोगाई रस्ता, दयानंद महाविद्यालयाच्या समोरील रयतू बाजारात देखील अशी दुकाने थाटण्यात आली होती. तिळगूळ, तिळगुळाच्या वड्या, वाणाचे साहित्य, साखरेपासून तयार करण्यात आलेला हलवा, हळदी-कुंकवाची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. या सणाला नवीन चुडे व बांगड्यांना महत्त्व असते. त्यामुळे अशा दुकानांवर महिलांची मोठी गर्दी राहिली. सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानांतही मुलींची झुंबड होती. या सणाच्या पूजेसाठी सुगड्यांचा वापर केला जातो. त्यामुळे याची खरेदी करण्यासाठी देखील महिलांची गर्दी होती. पूजेच्या साहित्याची मोठी विक्री झाली. सणानिमित्ताने येथील बाजारपेठ फुलून गेली होती. ही वाहतूक सुरळीत होण्यास बराच वेळ लागत होता. घरोघरी महिलांनी पारंपारिक पद्धतीने भोगी उत्साहात साजरी केली.

Web Title: market full for makar sankrant