आधी बाजारपेठांचा अभ्यास आवश्‍यक - अभिजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

आपल्याकडे क्षमता आहेत, मेहनतीची तयारी आहे. जे करायचे ते ‘ग्लोबल’ दर्जाचे करायला हवे. ‘स्टार्टअप’मधून आलेल्या उत्पादनाला दीर्घकाळ स्पर्धेत ठेवण्यासाठी जगातील बाजारपेठांचा अभ्यास करा, असा मंत्र ‘एपी ग्लोबल’चे अध्यक्ष आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी तरुणांना दिला.

औरंगाबाद - आपल्याकडे क्षमता आहेत, मेहनतीची तयारी आहे. जे करायचे ते ‘ग्लोबल’ दर्जाचे करायला हवे. ‘स्टार्टअप’मधून आलेल्या उत्पादनाला दीर्घकाळ स्पर्धेत ठेवण्यासाठी जगातील बाजारपेठांचा अभ्यास करा, असा मंत्र ‘एपी ग्लोबल’चे अध्यक्ष आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी तरुणांना दिला. 

मराठवाडा ‘ॲक्‍सिलरेटर फॉर ग्रोथ ॲण्ड इन्क्‍युबेशन कौन्सिल’ (मॅजिक)च्या पदाधिकाऱ्यांसह मराठवाड्यातील ‘स्टार्टअप’च्या माध्यमातून आपले अस्तित्व निर्माण करणाऱ्या तरुण उद्योजकांशी बुधवारी (ता. तीन) अभिजित पवार यांनी ‘सीएमआयए’च्या कार्यालयात संवाद साधला. या मॅरेथॉन संवादावेळी संचालक प्रसाद कोकीळ, रितेश मिश्रा यांनी सुरवातीला ‘मॅजिक’बाबत माहिती दिली. मराठवाड्यातील औद्योगिक आणि तंत्रशिक्षणातील कामाचा लेखाजोखा या दोघांनी मांडला. यानंतर ‘स्टार्टअप’ची माहिती घेताना श्री. पवार यांनी तरुणांकडून त्यांच्या उत्पादनाची माहिती घेतली. बीड जिल्ह्यातील नामदेव आणेरावांनी आपल्या ट्रॅक्‍टरची कहाणी सांगितली. आयशा सिद्धिकाने एचआर कन्सल्टन्सी स्टार्टअपबाबत सांगितले. अंकुर अनपटने इंडस्ट्रिअल ऑटोमोबाईल डिझाईन मांडले. थ्रीडी प्रिंटिंगमधील योगेश पवारने ऑनलाइन ऑर्डरवरील साखळी मांडली. योगेश गावंडेने एका चाकावर चालणाऱ्या फवारणी यंत्राबाबत सांगितले. देवगिरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी कांदा हार्वेस्टर कार्यक्रमस्थळी आणले होते. 

यावेळी संजीव गुप्ता, संतोष व्यास, डॉ. जसप्रीत छाबडा, एस. एम. अग्रवाल, आर. एस. शिंदे, महेंद्र सेठी, जयप्रकाश शिंपी, विजय गुप्ता, प्रकाश गायकवाड, विश्वास कुरूलकर, प्राचार्य डॉ. पी. बी. मुर्नाळ, विवेक भोसले, मनीष अग्रवाल, मनीष गुप्ता, गजानन देशमुख, बी. एस. खोसे, राम भोगले, किशोर राठी, वसंत वाघमारे, प्रसाद कोकीळ, ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार, उमेश दाशरथी, सुनील रायठठ्ठा, मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.

उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद
औरंगाबादेत कार्यरत असलेल्या सीएमआयए, डब्ल्यूआयए आणि मासिआच्या पदाधिकाऱ्यांशीही श्री. पवार यांनी संवाद साधला. जगभरात उद्योग, गुंतवणूक, रिअल इस्टेट, स्किल डेव्हलपमेंट, कम्युनिटी डेव्हलपमेंट, तंत्रज्ञान, स्टार्टअप क्षेत्रांमध्ये सुरू असलेले बदल त्यांनी उपस्थितांना सांगितले. बैठकीत बोलताना सीएमआयए अध्यक्ष राम भोगले म्हणाले, की उद्योग संघटना आपल्या परीने शहराच्या समस्यांसाठी भांडतात. कधी त्यात यश येते तर कधी नाही. औरंगाबादेतील उद्योगांना आपल्यासोबत काम करायला आवडेल. आपल्याला एकत्रितपणे कुठे काम करता येईल, यावर संघटनांनी विचार सुरू केला आहे. आपल्यासोबत काम केल्यास औरंगाबादच्या वाट्याला नक्कीच काहीतरी चांगले येईल, असा विश्वास वाटतो.

काम ‘सच्चे’ असेल तर अडविणार कोण? 
आपल्या कामात दम असेल आणि ते सच्चेपणाने केले तर आपल्या कामाची विश्वासार्हता तयार होते. यातून विश्वास संपादन केला तर तुमच्या चांगल्या कामाला कोणीही अडविणार नाही, असा सल्ला अभिजित पवार यांनी यावेळी तरुण उद्योजकांना दिला. आपल्या कामाचा अनुभव या तरुण उद्योजकांना सांगताना त्यांनी परदेशात अपयशातून उभ्या राहिलेल्या स्टार्टअपची उदाहरणे दिली. स्टार्टअप यशस्वी न ठरलेल्या तरुणांकडे अपयशी म्हणून पाहण्याची दृष्टी आपल्याकडे बदलायला हवी, असे रोखठोक मतही श्री. पवार यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Market Study Important Abhijit Pawar