बॅंकांकडे आल्या शंभरावर लग्नपत्रिका!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यापासून रोख रकमेची मोठ्या प्रमाणात चणचण बॅंकांना जाणवत आहे. दुसरीकडे रिझर्व्ह बॅंकेकडून दररोज नवनवे निर्देश दिले जाताहेत. लग्नासाठी अडीच लाख रुपये देण्यात येण्याचे फर्मान रिझर्व्ह बॅंकेने दिले; मात्र अद्याप बॅंकांना याबद्दल कुठलेही निर्देश नसल्याने लगीनघाई तूर्तास पुढे ढकलावी लागली.

औरंगाबाद - हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यापासून रोख रकमेची मोठ्या प्रमाणात चणचण बॅंकांना जाणवत आहे. दुसरीकडे रिझर्व्ह बॅंकेकडून दररोज नवनवे निर्देश दिले जाताहेत. लग्नासाठी अडीच लाख रुपये देण्यात येण्याचे फर्मान रिझर्व्ह बॅंकेने दिले; मात्र अद्याप बॅंकांना याबद्दल कुठलेही निर्देश नसल्याने लगीनघाई तूर्तास पुढे ढकलावी लागली.

सध्या एटीएमद्वारे दोन, रोख 24 हजार, तर लग्नासाठी अडीच लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा रिझर्व्ह बॅंकेने केली; परंतु लग्नासाठी अडीच लाख रुपये खातेधारकांना देण्यात यावे, याचे साधे पत्रसुद्धा बॅंकांना मिळालेले नाहीत. या निर्णयाने लगीनघाई सुरू असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळाला. त्यामुळे शनिवारी (ता. 19) बॅंकांमध्ये अडीच लाख रुपये मिळविण्यासाठी रीघ लागली. औरंगाबादमधील राष्ट्रीयीकृत आणि खासगी बॅंकांमध्ये तब्बल शंभर ते 120 लग्नपत्रिका दाखल झाल्याचा अंदाज आहे. "नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' उक्‍तीचा तंतोतंत अनुभव लग्नघराला आला. वर-वधूंच्या कुटुंबीयांनी अडीच लाख रुपये घेण्यासाठी बॅंका गाठल्या. बॅंकांकडे अगोदरच रोख रकमेची टंचाई त्यात आरबीआयकडून निर्देशही प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे निराश होऊन वधू-वर पक्षाला परतीचा रस्ता धरावा लागला.

अद्याप निर्देश नाही
बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी देविदास तुळजापूरकर म्हणाले, की लग्नासाठी अडीच लाख रुपये देण्यासंदर्भात कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाही. त्याचबरोबर बॅंकांकडे रोख रकमेचा तुटवडा आहे. यामुळे शनिवारी तब्बल दोन तास बॅंक बंद ठेवावी लागली. हीच परिस्थिती बहुतांश बॅंकांमध्ये आहे. शनिवारी दहा लाख रुपयांत बॅंक चालवावी लागली. लग्नासाठी पैसे दिले असते तर चार जणांनाच ही रक्‍कम पुरली असती. त्यामुळे आरबीआयचे निर्देश आणि मुबलक रोख रक्‍कम मिळाल्यास पैसे देण्यास बॅंकांना काहीही हरकत नाही. आता पाचशे रुपयांच्या नव्या नोटेची प्रतीक्षा आहे.

बॅंक कर्मचारी हैराण
हजार-पाचशे रुपयांची नोट बदलल्यापासून आरबीआयतर्फे दररोज नियम दाखविले जात आहेत. त्यामुळे कधी, कोणता नियम येईल हे सांगता येत नाही. सर्वप्रथम नोटा बदलून घेण्याची मर्यादा चार, त्यानंतर साडेचार आणि आता दोन हजार रुपये करण्यात आली. त्यानंतर नोटा बदलल्यावर खातेधारकांच्या बोटावर शाई लावण्याचा नवा नियम. शनिवारी (ता. 19) ज्येष्ठ नागरिकांना नोटा बदलून देण्याचे निर्देश... आर्थिक टंचाईसह दररोज नवनव्या नियमांना बॅंक कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बॅंकांतील अधिकारी-कर्मचारी नियम पाळताना हैराण होत आहेत.

एसबीआयचे 208 एटीएम कार्यान्वित
स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे प्रशासकीय मुख्य व्यवस्थापक सुनील गोरख राम म्हणाले, की औरंगाबाद आणि जालन्यात एसबीआयचे एकूण 208 एटीएम आहेत. हे एटीएम अपग्रेड करण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू होते. शनिवारी बहुतांश एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा सर्व एटीएमवर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

एसबीएचचे 54 एटीएम अपग्रेड
एसबीएच स्टाफ असोसिएशनचे उपमहासचिव रवी धामणगावकर म्हणाले, की विभागातील एकूण 81 पैकी 60 एटीएम औरंगाबादमध्ये आहेत. यापैकी 54 एटीएम अपग्रेड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्व एटीएम सोमवारपर्यंत अपडेट होतील. त्यामुळे सर्व एटीएमवर लवकरच 2000 च्या नोटा मिळण्यास सुरवात होईल.

युद्धपातळीवर काम सुरू
सीएमएस कंपनीचे संतोष राजपूत म्हणाले, की आमच्या कंपनीकडे एसबीआय, एसबीएच, आयडीबीआय आणि डीसीबी या बॅंकांच्या एकूण 160 एटीएम मशीनचे काम आहे. हे सर्व एटीएम अपग्रेड करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. साधारणत: एका दिवसाला एक तंत्रज्ञ दहा एटीएम अपडेट करतात. औरंगाबादमध्ये एटीएम, सीडीएमसंदर्भात काम करणाऱ्या सहा कंपन्या आहेत. त्यांचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे लवकरच सर्व एटीएमवर 2000 रुपयांच्या नोटा उपलब्ध होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage card in bank