लिंग बदलून लग्न करणारा पुरुष परिपक्व, बीडच्या नवदांपत्यांकडून डॉक्टरचा सत्कार 

पांडुरंग उगले 
Tuesday, 25 February 2020

बीड जिल्ह्यातील ललिता साळवे तब्बल २६ वर्षे महिला म्हणूनच वावरली. विशेष म्हणजे पुढे बीड पोलिस दलात महिला शिपाई म्हणून नोकरीही लागली. पण पुढे ललिताला पुरुष असल्याचे जाणवू लागले. नंतर वैद्यकीय तपासण्याही केल्या. शरीरात पुरुषाची लक्षणे असल्याने लिंग बदलून पुरुष होण्याचा निर्णय घेऊन तशी शस्त्रक्रियाही झाली. स्रीचा पुरुष बनलेल्या ललितचे एका तरुणीशी लग्न झाले. नवदांपत्यासह ग्रामस्थांनी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचा रिसेप्शन सोहळ्यात सत्कार केला.

माजलगाव (जि. बीड) - आयुष्याची २६ वर्ष ‘ती‘म्हणून जगल्यानंतर महिला पोलिस शिपाई ललिताला आपण पुरुष असल्याची जाणीव झाली. तीने लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर “तो” झालेल्या ललितच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा रविवारी (ता.२३) राजेगावात पार पडला.

पोलिस प्रशासनासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांसह लिंगबदल शस्त्रक्रिया करून ललीतचे आयुष्य बदलून टाकणारे मुंबई येथील डॉ. रजत कपूर यांचे ग्रामस्थांनी वाजतगाजत स्वागत केले. दरम्यान, लिंगबदल शस्त्रक्रिया करून स्त्रीचा पुरुष झालेला ललित आता परिपक्व पुरुष झाला आहे. यापुढे वैवाहिक आयुष्य जगताना त्याला कोणत्याच अडचणी येणार नसल्याचे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे डॉ. रजत कपूर यांनी सांगितले. 

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...

माजलगाव शहर ठाण्यात महिला पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या ललिता साळवे यांना वयाच्या २५ वर्षानंतर स्वतःतील शारीरिक बदल जाणवू लागले. आपण स्त्री नसून पुरुष असल्याची जाणीव ललिताला झाल्यानंतर स्त्रीचे आयुष्य न जगण्याचा निर्णय तीने घेतला. यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी पहिले पाऊल टाकले; परंतु महिला म्हणून पोलीस प्रशासनात भरती झालेल्या ललिताला पुरुष झाल्यानंतर नोकरी कायम ठेवण्याचे आवाहन होते. न्यायालयासह शासन स्तरावरील कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर दोन वर्षापूर्वी ललितावर मुंबई येथील सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉ. रजत कपूर यांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केली. ‘ती’चा ‘तो’ होत पुरुष म्हणून ललित पुन्हा नोकरीवर रुजू झाला. 

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

पुरुष म्हणून सर्वसामान्याप्रमाणे परिपूर्ण आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ललितने लिंगबदलानंतर आठ दिवसापूर्वी औरंगाबाद येथील उच्चशिक्षित तरुणीसोबत साध्या पद्धतीने साखरपुड्यात लग्न केले. राजेगाव (ता. माजलगाव) येथे रविवारी (ता.२३) लग्नानिमित्त रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. स्त्रीचा पुरुष होऊन लग्न केल्यानंतर या रिसेप्शनला वेगळे महत्त्व प्राप्त झाल्याने पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यासह सामाजिक, राजकीय, विधी, डॉक्टर क्षेत्रातील अनेक 
मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. यात ललितावर लिंगबदल शस्त्रक्रिया करून तिच्या आयुष्याला नवीन वळण देणारे डॉ. रजत कपूरही उपस्थित होते. ग्रामस्थांनी त्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढून सत्कारही केला. 

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

ललितमुळे राजेगावला नवीन ओळख : रूपाली कचरे 
लिंगबदल शस्त्रक्रियेसारखा धाडशी निर्णय घेणाऱ्या ललितचा ग्रामस्थांना अभिमान आहे. त्याने दाखवलेला आत्मविश्वास, हिंमत यामुळे देशपातळीवर राजेगावला एक नवीन ओळख मिळाली असल्याची प्रतिक्रिया सरपंच रूपाली कचरे यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage by changing gender