लग्नाची वरात, इव्हेंट मॅनेजमेंटच्या दारात!

संदीप लांडगे
मंगळवार, 2 एप्रिल 2019

वधू-वराची हटके ‘एंट्री’ 
वधू-वराची समारंभातील एंट्री आयुष्यभर आठवणीत कशी राहील, यावर जास्त खर्च केला जातो. जोडी व्यवसायाने डॉक्‍टर असेल तर ‘ॲम्ब्युलन्स एंट्री’, अभियंता किंवा उद्योजक असेल तर रोबोटिक, बलुन्स, फायर अशी एंट्री आहे. सध्या बाहुबली चित्रपटाच्या थीमला सर्वांत जास्त मागणी आहे.

औरंगाबाद - लग्नसमारंभ म्हटला की नात्यातला सर्वांत मोठा उत्सव असतो. सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रू सोसायटीपर्यंत सगळेच खर्च करून लग्न वेगळ्या पद्धतीने कसे केले हे दाखवितात. त्यासाठी लग्नपत्रिका, हळदी समारंभ अन्‌ संगीत रजनीत भन्नाट ‘आयडिया’ वापरून ते क्षण संस्मरणीय करण्याचा प्रयत्न वधू-वरांकडील मंडळींकडून होत आहे. 

पूर्वी लग्नसमारंभात पाहुण्यांच्या स्वागतासाठी नात्यातील मुली नटून-थटून मंडपाच्या प्रवेशद्वारावर उभ्या राहत; पण आता इव्हेंट मॅनेजमेंटमुळे पाहुण्यांना ‘वेलकम’ करण्यासाठी व जेवण वाढण्यासाठी रशियन, चिनी तरुणीही नजरेस पडू लागल्या आहेत. एका शिडीवर सलग काही तास उभे राहून या मुली सर्वांचे स्वागत करीत असतात. मुंबई, पुण्यासारख्या महानगरांतील लग्नाच्या इव्हेंट मॅनेजमेंटचा ट्रेंड आता औरंगाबादेतही रुजू लागला आहे. हल्ली विभक्त कुटुंबपद्धतीमुळे पैसे असूनही लग्नाच्या तयारीसाठी अपेक्षेइतके मनुष्यबळ मिळत नाही. त्यामुळे नातेवाईक एक इव्हेंटला पॅकेज ठरवून देतात; तसेच सुरक्षारक्षक, बॅंड, स्टेज डेकोरेशन, मनोरंजनाचे कार्यक्रम इव्हेंटच्या हाती गेले आहेत. केवळ पाहुण्यांना आमंत्रित करायचे कामच वर-वधुपित्यांकडे असते. 

इव्हेंट मॅनेजमेंटमार्फत संगीत रजनी, हळदी समारंभ पार पाडले जातात. एका थाळीमागे पाचशे ते साडेतीन हजार रुपये आकारून मनसोक्त भोजनाचा आनंद दिला जातो. पाणीपुरीपासून महाराष्ट्रीन, साऊथ, पंजाबी, चायनिज अशा थाळी दिल्या जातात. यातही ‘सेल्फ सर्व्हिस’चा फंडा वापरला जातो. 

वाढपी मुलींची टीम 
पूर्वी वाढपी म्हणून नातेवाईकच राहत; पण आता लग्नात वाढपी म्हणून मुलीच समोर उभ्या राहिल्यातर अनेकांच्या भुवया उंचावतात. खाद्यपदार्थांचे स्टॉल व गुणवत्ता पाहता इकडे जाऊ की तिकडे अशी पाहुण्यांची अवस्था होते. हा सगळा इव्हेंट वीस ते पंचवीस लाखांच्या घरात असतो.

क्रिएटिव्ह इव्हेंटची संकल्पना गृहीत धरून थीम डिझाईन केली जाते. यात बॉलीवूड थीम, साऊथ मुव्ही थीम, हॉलीवूड थीम करून नृत्य बसविले जाते. भोजनात पाचशे ते साडेतीन हजारांपर्यंत थाळी उपलब्ध आहे. 
- मुक्तेश्‍वर खोले, इव्हेंट मॅनेजर

Web Title: Marriage Event management Entertainment