पोलिस अधीक्षकांच्या साक्षीनेच बांधली लग्नगाठ, लॉकडाउनमुळे दोघांचेही पालक नाहीत 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

अभियंता असलेल्या प्रताप दातार आणि वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवीधारक असलेल्या प्रतीक्षा कोल्हे यांचा विवाह निश्‍चित झाला होता. वर प्रताप केज तालुक्यातील असले, तरी ते सध्या शहरात मित्राकडे राहत होते. तर औरंगाबाद जिल्ह्यातील वधू प्रतीक्षा देखील नातेवाइकांकडे बीडमध्येच वास्तव्यास होत्या

बीड - विवाह तर ठरला; पण लॉकडाउनचा अडसर आला. मग, वधू-वरांनी थेट एसपी ऑफिस गाठले आणि पोलिस अधीक्षकांच्या साक्षीनेच बुधवारी (ता. १३) एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालत लग्नगाठ बांधत पोलिस अधीक्षकांसमोरच आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याची प्रतिज्ञा घेतली. विशेष म्हणजे या दांपत्याने पोलिस कल्याण निधीसाठी मदत देऊ केली आहे. 

शहरातील अभियंता असलेल्या प्रताप दातार आणि वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवीधारक असलेल्या प्रतीक्षा कोल्हे यांचा विवाह निश्‍चित झाला होता. वर प्रताप केज तालुक्यातील असले, तरी ते सध्या शहरात मित्राकडे राहत होते. तर औरंगाबाद जिल्ह्यातील वधू प्रतीक्षा देखील नातेवाइकांकडे बीडमध्येच वास्तव्यास होत्या.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...

योगायोगाने दोघेही एका शहरात; परंतु लग्नाला लॉकडाउनचा अडसर होता. पुन्हा दोघांचेही नातेवाईक वेगवेगळ्या ठिकाणी; मात्र विवाह मुहूर्त साधण्यासाठी त्यांनी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना विनंती केली. मग पोद्दार यांनीही या नवदांपत्याच्या विनंतीला मान देत साक्षीला राहत दहा मिनिटांमध्ये त्यांच्याच दालनात हा सोहळा पार पडला. या विवाहाला श्री. पोद्दार यांच्यासह वधूची आई आणि वराचा भाऊ असे मोजकेच वऱ्हाडी हजर होते. 

हेही वाचा - शेती, शेतकरी आणि कोरोना....असे बदललेय ग्रामीण जीवन

पोलिस कल्याण निधीला मदतीसाठी विनंती 
विवाहासाठी लागणारा टळलेला खर्च या दांपत्याने पोलिस कल्याण निधीसाठी देऊ केला; मात्र हा निधी स्वीकारण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांची परवानगी गरजेची आहे. त्यांची परवानगी मिळाल्यानंतर निधी स्वीकारू, असे हर्ष पोद्दार यांनी या दांपत्याला सांगितले. 

 

विवाह हा आनंदाचा सोहळा आहे. या दोघांच्या नवीन आयुष्याचा साक्षीदार होण्याचाही आनंद घेता आला. संकटकाळी तयार झालेले नाते अधिक घट्ट असते. तसे यांचे नाते आयुष्यभर कणखर राहील व आयुष्य आनंदी जाईल, अशा शुभेच्छा दिल्या. 
- हर्ष पोद्दार, पोलिस अधीक्षक, बीड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The marriage was solemnized by the witness of the Superintendent of Police