पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीची विष घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

चारित्र्याच्या संशयावरून पती सतत देत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून पत्नीने स्वतः विषारी औषध घेऊन तीन वर्षांच्या मुलीलाही औषध पाजले. यात पत्नीचा मृत्यू झाला असून, मुलीवर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारकीन (ता. पैठण) येथे रविवारी (ता. आठ) संध्याकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी, पैठण पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीस अटक केली आहे.

जायकवाडी  (जि.औरंगाबाद) : चारित्र्याच्या संशयावरून पती सतत देत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून पत्नीने स्वतः विषारी औषध घेऊन तीन वर्षांच्या मुलीलाही औषध पाजले. यात पत्नीचा मृत्यू झाला असून, मुलीवर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारकीन (ता. पैठण) येथे रविवारी (ता. आठ) संध्याकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी, पैठण पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीस अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारकीन येथील सुनीता कृष्णा जाधव (वय 35) हिचा वर्ष 2007 मध्ये कचनेर तांडा क्रमांक दोन (ता. औरंगाबाद) येथील कृष्णा जाधव याच्याशी प्रेमविवाह झाला होता. सुनीताला दोन मुले, एक मुलगी आहे. सुनीता व कृष्णा यांच्यात सतत कौटुंबिक वाद होऊन भांडणे होत होती. शनिवारी (ता. सात) सुनीताने भाऊ अनिल राठोड याला फोन करून माझा पती विनाकारण चारित्र्यावर संशय घेऊन मला मानसिक त्रास देतो, असे सांगितले व फोन ठेवून दिला. त्यानंतर कृष्णा व सुनीता यांच्यामध्ये वाद झाला. रागाच्या भरात सुनीता रविवारी (ता. आठ) घरातून निघून गेली. कारकीन शिवारातील एका कपाशीच्या शेतात तिने स्वतः विषारी औषध घेतले व सोबत असलेल्या तीन वर्षांच्या मुलीलाही विष दिले. सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांनी मृत सुनीता हिला शासकीय रुग्णालय बिडकीन येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

मुलीला उपचारासाठी औरंगाबादला येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. बिडकीन येथे सुनीताचे शवविच्छेदन करून अंत्यविधी करण्यात आला. यावेळी फिर्यादीच्या नातेवाइकांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे अर्चना पाटील यांनी तत्काळ आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलिस अधीक्षक गणेश गावंडे, सहायक पोलिस अधीक्षक गोरख भांबरे याच्या मार्गदर्शनाखाली अर्चना पाटील, फौजदार विद्या झिरपे, ढोरकीन बीट जमादार तुकाराम मारकळ, संजय सपकाळ, शरद पवार, रामेश्वर तळपे, कोमल देहाडराय करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married Woman Committed Suicide In Karkin