मुख्यमंत्र्यांची भेट न होताच "वर्षा'वरून परतले महापौर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

""आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यासाठी गेलो होतो. त्यांची भेट झाली नाही. आदित्य ठाकरे यांची वेळ अगोदरच घेतली आहे. त्यामुळे नियोजित तारखेलाच कार्यक्रम होईल.'' 
नंदकुमार घोडेले, महापौर 

औरंगाबाद - शंभर कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन, शहर बससेवेच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निमंत्रण घेऊन गेलेले महापौर नंदकुमार घोडेले भेटीअभावी मुंबई येथील वर्षा बंगल्यावरून माघारी परतले. मुख्यमंत्र्यांनी आमदारांकरवी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वेळ देतो, असा निरोप दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, 23 डिसेंबरला कार्यक्रम उरकून घेण्याचा निर्णय शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे विकासकामांच्या श्रेयावरून युतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. 

शासनाने शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेला गतवर्षी जून महिन्यात शंभर कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. दीड वर्षांनंतर महापालिकेने गेल्या महिन्यात या निविदा अंतिम केल्या आहेत. दरम्यान, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर बससेवेचा प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पासह इतर विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 23 डिसेंबरला करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मात्र, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ न घेता ही तारीख जाहीर केल्याने भाजपने नाराजी व्यक्त केली. दरम्यान, महापौरांसह उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, सभागृहनेते विकास जैन, विरोधी पक्षनेते जमीर कादरी, उपायुक्त डी. पी. कुलकर्णी यांचे शिष्टमंडळ मुंबईला गेले होते. मुंबईत गेल्यावर महापौर घोडेले, वैद्य, जैन हे पालकमंत्र्यांची भेट घेण्यासाठी निघून गेले. सायंकाळी सात वाजता "वर्षा' बंगल्यावर सायंकाळी सर्वजण भेटण्याचे निश्‍चित झाले. भाजपच्या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक राजू शिंदे, दिलीप थोरात आदींची उपस्थिती होती. मात्र, नियोजित वेळेत शिष्टमंडळ वर्षावर पोचले नाही. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदार, मंत्र्यांसोबत बैठक सुरू केली. महापालिकेच्या शिष्टमंडळाने त्यांना चिठ्ठी पाठविली. मुख्यमंत्र्यांनी भाजपचे संघटनमंत्री सूरजितसिंग ठाकूर, अतुल सावे यांना बोलावून पुढील आठवड्यात औरंगाबादला येण्याचे आश्वासन दिले. 

""आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यासाठी गेलो होतो. त्यांची भेट झाली नाही. आदित्य ठाकरे यांची वेळ अगोदरच घेतली आहे. त्यामुळे नियोजित तारखेलाच कार्यक्रम होईल.'' 
नंदकुमार घोडेले, महापौर 

Web Title: Mayor returned from the varsha after not meeting the CM