एमबीबीएसच्या वीस विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश 

अनिल जमधडे 
गुरुवार, 29 मार्च 2018

औरंगाबाद खंडपीठाने गुणवत्ता डावलून पैसे घेऊन दिलेले वीस विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द ठरविले. त्याचबरोबर या महाविद्यालयाची मान्यता व संलग्नता रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले.

औरंगाबाद - जळगावच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुणवत्ताधारक विद्यार्थीनीला प्रवेश नाकारण्यात आला होता. या विरोधात दाखल याचिकेच्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुणवत्ता डावलून पैसे घेऊन दिलेले वीस विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द ठरविले. त्याचबरोबर या महाविद्यालयाची मान्यता व संलग्नता रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले. खंडपीठाच्या या निर्णयाने एमबीबीएस झालेल्या वीस विद्यार्थ्यांची पदवी रद्द गमवावी लागणार आहे. 

सोनपेठ (जि. परभणी) येथील तेजस्विनी राजकुमार फड या विद्यार्थीनीला सन 2012 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या सीईटीमध्ये 153 गुण होते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने त्यांना डावलून कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. तेजस्विनी फड यांच्या तक्रारीनंतर निवड समितीने महाविद्यालयाची चौकशी केली आणि महाविद्यालयाने दिलेले प्रवेश बेकायदेशीर ठरवले तरीही शासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे तेजस्विनी फड यांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली.

सुनावणी दरम्यान पैशांसाठी बेकायदेशीरपणे प्रवेश प्रक्रिया राबवून महाविद्यालयाने कमी गुण असलेल्यांना प्रवेश दिल्याचा प्रकार गंभीर असल्याचे निरिक्षण खंडपीठाने नोंदवले. वैद्यकीय महाविद्यालयाने वीस विद्यार्थ्यांना दिलेले प्रवेश बेकायदेशीर असल्याचा निर्णय त्यावेळी प्रवेश नियंत्रण समितीने दिला होता. त्याच निर्णयावर खंडपीठाने शिक्कामोर्तब केले. याचिकाकर्त्या तेजस्विनी फड यांना महाविद्यालयाने वीस लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. तसेच शासनाने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता आणि संलग्नता रद्द करावी. असे आदेश न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती सुनील कोतवाल यांनी दिले आहेत. 

Web Title: MBBS admission of 20 students cancel in aurangabad