सीसीटीव्ही बंद ठेवून फिटनेस तपासणी, आरटीओची प्रक्रियाच संशयास्पद

अनिल जमधडे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाच्या फिटनेस ट्रॅकवर तब्बल पंधरा दिवस सीसीटीव्ही बंद ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, या काळात दोन हजारावर वाहनांना योग्यता प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. या निमित्ताने न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासला गेला आहे. 

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाच्या फिटनेस ट्रॅकवर तब्बल पंधरा दिवस सीसीटीव्ही बंद ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, या काळात दोन हजारावर वाहनांना योग्यता प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. या निमित्ताने न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासला गेला आहे. 

आरटीओ कार्यालयातर्फे करोडी येथील फिटनेस ट्रॅकवर वाहनांची तपासणी केली जाते. वाहनांची तपासणी करुन फिटनेस प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे. यापूर्वी राज्यभर झालेल्या फिटनेस घोटाळ्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. याचिकेत न्यायालयाने सीसीटीव्ही आणि व्हिडीओ शुटींगमध्येच योग्यता प्रमाणपत्रासाठी वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या घोटाळ्याच्या अनुषंगाने राज्यभर 36 मोटार वाहन निरीक्षक निलंबीत झालेले आहेत. या निलंबनात औरंगाबाद कार्यालयाच्या चार मोटार वाहन निरीक्षकांचा सामावेश आहे. तर दोन जणांची अद्यापही चौकशी सुरु आहे.

हेही वाचा : यापुढे बिबटे येतच राहणार... 

न्यायालयाच्या आदेशानंतर करोडी येथील फिटनेस ट्रॅकवर आरटीओ कार्यालयाने नऊ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. वाहनाची तपासणी होत असतानाचे, सीसीटीव्ही फुटेज परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत प्रत्येक महिन्याला तपासण्यात येतात. असे असतानाही गेल्या महिन्यात तब्बल पंधरा दिवस सीसीटीव्हीच बंद ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याचे सुत्रांनी सांगीतले. 

काळजी का? 

न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यभर फिटनेस तपासणी अत्यंत बारकाईने केली जात आहे. वाहनमालक मूळ वाहनांच्या रचनेत बदल करतात. ट्रकची उंची, लांबी किंवा रुंदी वाढवून सर्रास मालवाहतूक केली जाते. अशा वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र दिल्या जात होते. न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकाराला आळा बसला आहे. मात्र सीसीटीव्ही फुटेज बंद ठेवण्याचे कारण काय असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

क्‍लिक करा : रागाने घराबाहेर...रात्रभर पायपीट 

चौकशीची मागणी 

फिटनेस ट्रॅकवरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद का ठेवण्यात आले? या काळात किती वाहनांची फिटनेस तपासणी करण्यात आली, ही माहिती देण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण माडूकर यांनी केली आहे. विना कॅमेऱ्याच्या काळातील फिटनेस प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी माडूकर केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about rto