शिक्षण डॉक्‍टरकीचे, धंदा चोरीचा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

एकोणावीसपैकी अकरा ‘शाईन’च
दोघांनी चोरी करताना पैसे जास्त मिळवून देणारीच दुचाकी टार्गेट करायची असा अलिखित निकष त्यांनी लावला होता. त्यामुळेच त्यांनी विकण्याच्या दृष्टीने अकरा ‘शाईन’ चोरल्या, उर्वरित चोरीत हाती लागतील त्या दुचाकींचा समावेश होता.

औरंगाबाद - वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी दुचाकी चोऱ्या करीत असेल तर..!, विश्‍वास बसणार नाही ना; पण ही बाब खरीय. ‘बीएचएमएस’चे शिक्षण घेणारा तरुण गावातल्याच सातवी पास तरुणाच्या वाईट संगतीला लागला आणि चोरीच्या ‘उद्योगा’त रमला. अवघ्या तीन महिन्यांत दोघांनी मिळून एक-दोन नव्हे, तर तब्बल १९ दुचाकी चोरी केल्या. या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आल्या. 

नाजीम बनेखान पठाण (वय २२, रा. नाचनवेल, ता. कन्नड, जि. औरंगाबाद), विजय पुंडलिक दिवटे (२८, रा. ह.मु. रामनगर, मूळ नाचनवेल) अशी संशयितांची नावे आहेत. नाजीम जळगाव येथील एका महाविद्यालयात ‘बीएचएमएस’चे शिक्षण घेतो तेही पार्टटाइम! कुटुंबीय शेती करतात, पॉकेटमनीसाठी दुचाकी चोरी हा चुकीचा पर्याय त्याने डोळ्यासमोर ठेवला. तो आणि विजय एकाच गावातील असल्याने दोघांनी मिळून सहा महिन्यांपूर्वी एक दुचाकी चोरली. यानंतर विश्रांती घेतली; पण नंतर तीन महिन्यांनी पुन्हा चोरीचा सपाटा लावला. शहरातील विविध भागांतून त्यांनी एकूण १९ दुचाकी लंपास केल्या. एका व्यक्तीमार्फत दोघांच्या कारनाम्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांना समजली. त्यांनी पथकासोबत संशयित दोघांना ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त गुणाजी सावंत, निरीक्षक अशोक गिरी यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हवालदार नरसिंग पवार, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, संजय सिरसाठ, स्वप्नील रत्नपारखी, सुरेश भिसे, किशोर गाढे यांनी केली. 

त्यानेच लावला नाद
सातवी पास विजय व वैद्यकीय शिक्षण घेणारा नाजीम एकाच गावचे. विजयने त्याला दुचाकी चोरीचा फंडा सांगितला. पैसे नसल्यास दुचाकी चोरी झटपट पैसा मिळवून देते. असे त्याने नाजीमच्या मनात भरविले आणि मग नाजीमही ‘स्टार्ट’ झाला. नंतर किक मारून दुचाकी चोरीच्या फंद्यात पडला. 

पैसे नव्हते, काय करणार?
‘‘वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली नव्हते तेव्हा पिशोर परिसरात २००६ ला दुचाकी चोरी केली होती. त्यात गुन्हाही नोंद झाला होता. त्यानंतर मजुरी कामाला लागलो; परंतु आर्थिक चणचणीमुळे दुचाकी चोरीकडे वळलो. खर्चासाठी पैसे नव्हते, डोक्‍यात आले अन्‌ चोरी केली,’’ अशी बाब त्याने सांगितल्याचे पोलिस म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Education Doctor Theft Crime