‘हे’ माध्यम आहे एकाग्रता वाढविण्यासाठी झक्कास, कोणते? ते वाचाच  

प्रमोद चौधरी
शनिवार, 4 एप्रिल 2020

विज्ञान प्रयोग, कलाकुसर, खेळ आदी माध्यमांतून एकाग्रता वाढण्यास खूप मोठी मदत होत असते. परंतु, एक माध्यम आहे, ते म्हणजे भजन-गायन. ज्यात लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अशा सर्वांनाच सहभागी होऊन मनाची एकाग्रता वाढविता येते.  अलिकडे या माध्यमाकडे कल वाढताना दिसत आहे.

नांदेड : भजन म्हणजे मनाची एकाग्रता. भजनातील शब्द, अर्थ, विचार, संगीत-स्वर, ताल, लय, वाद्य, टाळ या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे भजन. कारण भजनाला संगीताच्या स्वरांची आणि नादमयतेची साथ असते. भजन म्हणजे परमेश्वराच्या दिव्यशक्तीचे गुणगान, दिव्यशक्तीचे चिंतन, एकाग्रता. भजन म्हणजे आत्मोन्नती, होकारात्मक विचार, मनाचे आरोग्य, शारीरिक व्याधी विसरणे, बुद्धीचा विकास करणे होय.

एकाग्रतेसोबतच मनात वाईट विचार येत नाहीत
नादब्रम्हामुळे भजन गाणारा साधक परमेश्वराच्या नावाचे शब्द, त्याचा अर्थ आणि ते उच्चारण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वरांशी एकरूप होतो. त्यांचा (एकरुपत्वाचा) आनंद अनुभवून शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक असे त्रास विसरून व्याधी निर्मुलन करण्यासाठी मनाची सकारात्मक अवस्था निर्माण होते. भजन म्हणजे परमेश्वराच्या शक्तीची अनेक रुपे आहेत. प्रत्येक रुपाचे नाव वेगळे; अशा वेगवेगळ्या रुपांमध्ये प्रकट झालेल्या परमशक्तीचे नाव घेत बसले तर मनात कसलेही वाईट विचार येत नाहीत.

हेही वाचा - गुरुद्वारा बोर्डातर्फे घरपोच लंगर सेवा

मनांवर होतात गुणांचे संस्कार
जसे संत तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल पांडुरंग यातच गुंग असत. असे मन जर एकाच ठिकाणी स्थिर झाले; तर मनाची शक्ती वाढते. विशेष म्हणजे मनावरही त्याच गुणांचे संस्कार होतात. भजनामध्ये नैराश्य, नकारात्मक विचार, आचार यांना स्थानच राहत नाही. भजन म्हणजे भक्तीचा सर्वात सोपा प्रकार. सतत म्हटलेल्या भजनातून मनामध्ये भक्तीचाच आविष्कार होतो आणि साधक परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. जसे मनात वाईट गोष्टींचा विचार केला; तर मनावर वाईट संस्कार होतात. त्यामुळे माणसाच्या हातून कृतीपण वाईट होते. तसे भजनाने माणूस सतत परमेश्वराशी एकरूप होऊन राहतो. त्यामुळे त्याच्या हातून कर्मही चांगले घडते. चांगल्या विचारांमुळे आपल्या हातून आचारही चांगलेच घडतात. विशेष भजनासाठी कुठल्याही प्रकारच्या वयाची अट नसते.

येथे क्लिक कराच - दोन हजारांवर महिला बनल्या उद्योजिका, कशामुळे? ते वाचाच

भजन-गायन शिकण्याची क्रेझ
बच्चेकंपनीसोबतच तरुणाईमध्ये अलिकडे भजन-गायन शिकण्याची क्रेझ निर्माण झालेली आहे. नांदेड शहरामध्ये गल्ली बोळांमध्ये संगीत क्लासेस सुरु आहेत. या क्लासेसमध्ये वयाच्या पाचव्या वर्षांपासून ते अगदी ६०व्या वर्षांपर्यंतचे सर्वचजण भजन-गायन, हार्मोनिअम शिकताना दिसत आहे. तर बच्चेकंपनीसह तरुण मुले-मुली भजन-गायनासोबतच हार्मोनिअम, तबला, ढोलक, संतुरवाद्य वाजविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, नांदेड शहरामध्ये असंख्य युवकांनी तबला, पखवाज वाजविण्याचे प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहून इतरांनाही संगिताचे धडे देताना दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'This' is the Medium to Increase Concentration Nanded News