‘सीईओं’नी पकडली कॉपी !

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

जिल्ह्यात काही ठराविक केंद्रांवर सातत्याने कॉपी होत असल्याचे उघडकीस येत आहे. इंग्रजी विषयाच्या पेपरला १५, तर सोमवारी झालेल्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरला सर्वाधिक उच्चांक मोडणाऱ्या ७१ कॉपी अढळून आल्याने एकच खळबळ उडाली. 
 

परभणी : बारावी परीक्षे दरम्यान, बुधवारी (ता.२६) रसायनशास्त्र विषयाच्या पेपरला १४ आणि इतिहास विषयाच्या पेपरला एक कॉपी पकडण्यात आली आहे. जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी लोहगाव (ता. परभणी) येथे स्वत: कॉपी पकडली.

परभणी जिल्ह्यात काही ठराविक केंद्रांवर सातत्याने कॉपी होत असल्याचे उघडकीस येत आहे. इंग्रजी विषयाच्या पेपरला १५, तर सोमवारी झालेल्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरला सर्वाधिक उच्चांक मोडणाऱ्या ७१ कॉपी अढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने ११ परीक्षा केंद्रांचे संचालक, सहसंचालक आणि कर्मचारी बदलले.

हेही वाचा - शिवभोजनाची वेळ व थाळी पडतेय अपुरी...!

२७९ विद्यार्थी गैरहजर
 बुधवारी (ता. २६) सकाळच्या सत्रात रसायनशास्त्र विषयाचा पेपर झाला. त्यासाठी ५७ केंद्रांवर ११ हजार ९४९ विद्यार्थ्यांची नोंद होती. त्यापैकी ७७ हजार ६७० विद्यार्थी हजर राहिले, तर २७९ विद्यार्थी गैरहजर होते. या वेळी १४ कॉपी अढळून आल्या आहेत. त्यामध्ये श्री नृसिंह उच्च माध्यमिक विद्यालय लोहगाव (ता. परभणी) ः दोन, संस्कृती कनिष्ठ महाविद्यालय पूर्णा ः एक, ब्रम्हेश्वर कनिष्ट महाविद्यालय बामणी ः आठ, श्रीमती शांताबाई नखाते आश्रम शाळा वालूर ः तीन, याप्रमाणे कॉपी केस करण्यात आल्या आहेत. तर दुपारच्या सत्रात इतिहास विषयासाठी ५७ केंद्रांवर पाच हजार ९०३ विद्यार्थ्यापैकी पाच हजार ५११ विद्यार्थी हजर होते. ३९२ विद्यार्थी गैरहजर राहिले. या पेपरला चारठाणा (ता. जिंतूर) येथील संत जनार्धन कनिष्ठ महाविद्यालयात एक कॉपी पकडली.

हेही वाचा - मराठवाड्यातील देशी गोसंवर्धन कार्यास मिळणार गती

सीईओंनी दिली भेट
मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी परीक्षे दरम्यान, बुधवारी लोहगाव येथील श्री नृसिंह उच्च माध्यमिक विद्यालयातील केंद्रास भेट देऊन कॉपी पकडली.

त्या केंद्रांवर होणार कारवाई
पेडगाव (ता. परभणी) येथे इंग्रजीच्या पेपरला शिक्षकांनी उत्तरे सांगितल्याचा प्रकार चर्चेला आल्यानंतर विभागीय मंडळाकडून आणि शिक्षण विभागाकडून केंद्रसंचालकांना नोटीस पाठवून कारवाई करण्यासाठी ता.२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तसेच पेडगावच्या दोन्ही केंद्रांवर विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मुदतीअखेर कारवाई झाली नसल्याने आता शिक्षण विभाग मोठी कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting with 'CEO' at XII Examination Center