पुढे-पुढे करणारा 'तिथे' का दडतो कारभारणीमागे

family
family

औरंगाबाद : बहुतांश पुरुष पुरुषी मानसिकतेतून स्त्रियांना डावलण्याचा प्रयत्न करतात; पण कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेत ते मागे असून, स्त्रियांवरच ही जबाबदारी लादली जाते. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात सात हजारांहून अधिक महिलांवर या शस्त्रक्रिया झाल्यात; तर केवळ 17 "समजूतदार' पुरुषांनी आपल्या पत्नीला त्रास नको म्हणून स्वत:वर शस्त्रक्रिया करून घेतली.

कुटुंबनियोजनाच्या निकषातही धोरणकर्त्यांची पुरुषी मानसिकता दिसून येते. पुरुषांच्या कुटुंबनियोजनासाठी प्रतिपुरुष 1 हजार 500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याउलट स्त्रीने कुटुंबनियोजन करून घेतले तर अनुसूचित जाती, जमाती, दारिद्य्ररेषेखालील महिला असेल तर 650 रुपये आणि सर्वसाधारण प्रवर्गातील असेल तर फक्‍त 250 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. धोरणकर्त्यांनी समान उद्दिष्ट ठेवावे आणि कुटुंबाचा आधार असलेल्या स्त्रीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पुरुषांनी मानसिकता बदलली पाहिजे, असे मत महिलांना व्यक्‍त केले आहे.

स्त्रीला अधिक त्रासदायक
स्त्रीवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करायची झाल्यास पोट कापावे लागते. गर्भाशयाच्या पिशवीच्या नसा बांधून त्या कापून टाकल्या जातात किंवा लॅप्रोस्कोपीने शस्त्रक्रिया करावी लागते. शिवाय महिलेचे हिमोग्लोबिनचे प्रमाण 12 ग्रॅम असणे आवश्‍यक आहे; मात्र स्त्रीमध्ये 10 ग्रॅम हिमोग्लोबिन असले, तरी कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्याची तरतूद आहे. वास्तविक पाहता 10 ग्रॅम हिमोग्लोबिन म्हणजे ती ऍनिमियाग्रस्त असते, अशा अवस्थेतही तिच्यावर ही शस्त्रक्रिया केली जाते. परिणामी, भविष्यात संबंधित स्त्रीला मासिक पाळीतून जास्तीचा रक्‍तस्त्राव होणे, कंबरदुखी, पोट दुखणे आदी आजारांना सामोरे जावे लागते, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी दिली.

पुरुषांना त्रास कमी
डॉ. गडप्पा यांनी सांगितले, की पुरुषांवरची कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया खूप साधीसोपी आहे. पोटाच्या खालील शुक्राणू सोडणारी एक एमएमची नस असते तिला कापण्याची दोन मिनिटांची शस्त्रक्रिया आहे. सकाळी शस्त्रक्रिया झालेला पुरुष संध्याकाळी घरी जाऊ शकतो; मात्र कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणे, मुलांचे संगोपन करणे ही जणू स्त्रीचीच जबाबदारी आहे अशी समाजात मानसिकता रूढ आहे जी अतिशय चुकीची आहे.

आकडे बोलतात...
यंदाचे उद्दिष्ट : 18 हजार 911
आठ महिन्यांत झालेल्या शस्त्रक्रिया : 7 हजार 741
महिला : 7 हजार 724
पुरुष : 17
टाक्‍याच्या शस्त्रक्रिया : 5 हजार 547
बिनटाक्‍याच्या शस्त्रक्रिया : 1 हजार 890

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com