‘या’ शहरात मनोरुग्णांचा उपद्रव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

निर्वस्त्र शरीर...वाढलेली दाढी...डोक्यावरील केसांच्या बटा...विक्षिप्त बोलणे...हावभाव...रस्त्याच्या मध्येच उभे राहणे...रस्त्यावरून कधीही भटकंती करताना मळकट कपड्यांमुळे पसरलेली दुर्गंधी...अशा स्थितीतील वेडे आपल्या सभोवताली वावरताना आढळतात.

नांदेड : शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी किंवा हॉटेलच्या आसपास, रेल्वेस्थानक, बसस्थानकावर सध्या वेड्यांचा सुळसुळाट बघायला मिळत आहे. रस्त्यांवर अनवाणी पावलांनी चालताना अनेक वेडे दिसत आहेत. त्यामुळे नांदेड शहर आता वेड्यांचे माहेरघर होत चालले की काय? असा प्रश्‍न नांदेडकरांना पडला आहे.

शहरातील बस वाहतुक व्यवस्था तुरळक असल्यामुळे महिला व प्रामुख्याने महाविद्यालयीन युवतींना रिक्षा, बसची वाट पाहावी लागते. शहरातील अनेक निवारा शेडमध्ये वेड्यांनी बस्तान मांडलेले आहे. या वेड्यांच्या भीतीमुळे महिलावर्ग, विद्यार्थी यांना प्रवासी निवाऱ्याएवजी रस्त्यावरच उभे रहावे लागत आहे. बस्तान जमवल्यामुळे निवाराशेडमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात व पावसाळ्यातही रस्त्यावरच उभे राहावे लागत आहे. या वेड्यांची कोठेही, कशीही भटकंती सुरु असते. अंगावरच्या वस्त्रांचेही भान नसल्यामुळे महिला किंवा युवतींना याचा त्रास होत आहे.

हेही वाचा - ‘या’ छम...छमची पूर्वी नव्हती तक्रार

सामाजिक संघटनांनी समोर यावे
शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या वेड्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. साधारणपणे तिसीतल्या आसपासचे किंवा वृद्ध वेड्यांनी शहरात विविध भागांमध्ये आपले बस्तान मांडले आहे. गजबजलेल्या वस्तीतून मोकाट'फिरणाऱ्या वेड्यांचा नागरिकांना उपद्रव सहन करावा लागत आहे. बऱ्याच वेळा अंगावर वस्त्रे नसणाऱ्या अवस्थेतील अशा वेड्या स्त्री-पुरुषांचा शहरातील तरुण मुलींना तसेच महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनासह सामाजिक संघटनांनी समोर येऊन रस्त्यांवर फिरणाऱ्या अशा वेड्यांना पकडून त्यांच्यावर योग्य विलाज करावा, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.

वेड्यांसोबतच भिक्षा मागणाऱ्यांचाही त्रास
हातात एखादी फाटकी झोळी किंवा पोतडी घेऊन विचित्र बडबड करत कचरा किंवा कागद वेचत फिरताना रेल्वेस्थानक, बसस्थानक तसेच शहरातील विविध भागांमध्ये अनेक वेडे आढळतात. अन्यथा रस्त्याच्या मध्ये ठाण मांडून बसलेली किंवा चक्क झोपलेले आढळतात. काही वेडे बोलत नसले तरी हातवारे करत भिक मागताना आढळतात. या वेड्यांसोबतच भिक्षा मागणाऱ्यांचाही प्रवाशांना, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

हेही वाचाच - नांदेड एक्स्ट्रा ‘टॉनीक’ देणारे शहर

...तेरा प्यार नही भुलें
दुपारचे साडे बारा वाजले असावेत...पंचवीशीतला एक वेडा तरूण व्हिआयपी रोडवरून जात होता. ‘हम भूल गये रे हर बात...मगर तेरा प्यार नही भुलें’ असे गाणे तो जोर-जोरात म्हणत होता. दरम्यान या रोडवरील एका पानपट्टीवर उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये ‘मनावर खूप मोठा आघात झाल्याने त्याच्यावर वेडेपण ओढवल्याची चर्चा’ ऐकायला मिळाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mental illness in 'this' city