'एमजीएम'चे मराठवाड्यात पहिले विद्यापीठ स्थापन

'एमजीएम'चे मराठवाड्यात पहिले विद्यापीठ स्थापन

औरंगाबाद : एमजीएम ट्रस्टतर्फे यावर्षी 'एमजीएम विद्यापीठ'ची स्थापना करण्यात आली आहे. नव्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुधीर गव्हाणे तर, कुलसचिवपदी आशिष गाडेकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष पी. एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम यांनी मंगळवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत दिली. 

एमजीएम विद्यापीठ मराठवाड्यातील हे पाचवे विद्यापीठ असले तरी, स्वयंअर्थसहाय्यीत पहिलेच विद्यापीठ आहे. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधले आहे. विद्यापीठ 9 सप्टेंबर 2019 पासून कार्यरत झाले असून, पहिल्याच वर्षी 250 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. हॉटेल मॅनेजमेंट, एम.ए. इंटरनॅशनल जर्नालिझम, फॅशन डिझाईन, फोटोग्राफी, फाईन आर्टचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. 2020-21 वर्षात तीन हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतील, अशी योजना आहे.

एमजीएमच्या औरंगाबाद, नांदेड, नवी मुंबई, नोएडा-नवी दिल्ली याठिकाणी 67 संस्था, महाविद्यालये, रुग्णालये असून अध्यक्ष कमलकिशोर कदम आहेत. ट्रस्टमधील औरंगाबाद सिडकोच्या परिसरातील संस्था या विद्यापीठातंर्गत येतील. 

कुलगुरु डॉ. गव्हाणे म्हणाले, मराठवाड्यात जे अभ्यासक्रम नाहीत ते दिले जातील. पारंपारिक शिक्षणापेक्षा वेगळे देताना विद्यार्थी रोजगारक्षम घडविला जाईल. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी क्षेत्रात ऑनर्स पदवी असेल. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी 8 देशातील विद्यार्थ्यांची लवकरच परिषद घेण्यात येईल. यातून पहिल्या वर्षी 300 विद्यार्थी प्रवेश घेतील, अशी अपेक्षा आहे. जेएनईसीचे विद्यार्थीही जगभरात आहेत. त्यांच्या कंपन्यात आहेत. ते सहकार्य करतील. माजी विद्यार्थ्यांकडून होतकरु विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप देण्यात येईल. 

अध्ययन आणि अध्यापन पद्धतीत बदल करण्यात येणार असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या क्‍वालिटी मॅन्डेट 2022 नुसार लर्निंग आऊटकम बेस्ड करिक्‍युलम फ्रेमवर्कचा अवलंब केला जाणार आहे. याशिवाय सेवा, प्रकल्प आणि संशोधनावर आधारित शिक्षण असेल. विशेष म्हणजे विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थ्याला गांधी विचार अभ्यासक्रम देण्यात येईल. विद्यार्थ्यांना ग्रामीण परिवर्तन कार्यक्रम देण्यात येईल. पत्रकार परिषदेला संस्थेचे विश्‍वस्त प्रताप बोराडे, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक कर्नल डॉ प्रदीपकुमार, अधिष्ठाता डॉ. हरीरंग शिंदे, डॉ. रेखा शेळके यांची उपस्थिती होती. 

- असे असेल विद्यापीठ

* देश आणि विदेशातील विद्यार्थी शुल्क सारखेच 
* गरीब आणि हुषार 50 विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप 
* दरवर्षी 50 स्टार्टअप सुरु करण्यासाठी प्रेरणा 

नव्या विद्यापीठात या संस्था 

जेएनईसी, इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड रिसर्च, बायोटेक्‍नॉजी, फॅशन डिझाईन, जर्नालिझम ऍण्ड मासकम्युनिकेशन, महागामी संगीत अकादमी, फाईन आर्टस, डॉ. जी.वाय. पाथ्रीकर कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स ऍण्ड आय.टी., हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी, खादी ऍण्ड पैठणी रिसर्च सेंटर, स्पर्धा परीक्षा, एमजीएम क्रीडा विभाग या संस्था आणि महाविद्यालये एमजीएम विद्यापीठाचा घटक राहील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com