आम्हीही माणसे आहोत; वाळीत टाकल्यासारखे वागू नका... 

रवींद्र भताने
शनिवार, 28 मार्च 2020

सध्या कोरोनाने सर्वांची झोपच उडवली आहे. बाहेरगावी कामानिमित्त गेलेले नागरिक परत आपल्या गावी येत आहेत. मात्र आपल्याच जन्मगावात त्यांना प्रवेश नाकारला जातोय. त्यांच्याकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे हे तरुण फेसबुक व व्हाट्सअप च्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. अशा पोस्ट सध्या चांगल्याच व्हायरल होत आहेत.

चापोली (लातूर) : सध्या कोरोनाने सर्वांची झोपच उडवली आहे. बाहेरगावी कामानिमित्त गेलेले नागरिक परत आपल्या गावी येत आहेत. मात्र आपल्याच जन्मगावात त्यांना प्रवेश नाकारला जातोय. त्यांच्याकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे हे तरुण फेसबुक व व्हाट्सअप च्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. अशा पोस्ट सध्या चांगल्याच व्हायरल होत आहेत.

पदवीचे शिक्षण झाले की घरचे व नातेवाईक पुणे मुंबई ला जाऊन नोकरी कर म्हणत तगादा लावत असतात. ग्रामीण भागात उद्योगधंदे किंवा नोकरी मिळत नाही. परिणामी घर सोडून पुणे मुंबई अथवा इतर मोठ्या शहरात जावे लागते. उच्च शिक्षण घेऊन कंपनीत मोठ्या पदावर लागल्यावर किंवा एखादा उद्योगधंदा सुरू केला की आमचे ग्रामस्थ व मित्र अभिमानाने सांगतात की आमच्या गावातील तरुण मोठ्या पदावर आहे. तसेच गावातील इतर तरुणांनाही नोकरी लावण्यासाठी आमच्याकडे पाठपुरावा करत असतात. 

कावेरी जातीची अंडी मिळतील या केंद्रात  

मात्र आज कोरोनाच्या भीतीने माणुसकी संपली आहे की काय असेच वाटत आहे. आज सोशलमिडीयावर पुणे मुंबई वाल्यांना गाव बंदी अशा आशयाच्या फोटो व व्हिडिओ पाहिलं की वाईट वाटते. आज जरी आम्ही नोकरीसाठी व आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर गावी नोकरी करीत असलो तरी आमचे मूळ गाव आमच्या पासून कोणीच हिरावून शकत नाही. आज संपूर्ण देशावर संकट ओढावले आहे. यावर संयमाने व एकमेकाच्या साथीने मात करणे आवश्यक आहे. 

मात्र आमचे ग्रामस्थच आज आमच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. त्यामुळे आम्हाला वाळीत टाकल्यासारखी भावना आम्हाला होत आहे. अशी प्रतिक्रिया शंकरवाडी (ता. चाकूर) येथील तरुण सध्या मुंबई येथे नोकरी करीत असलेल्या सचिन चिलमे यांनी दिली आहे. आज पुणे मुंबई व इतर मोठ्या शहरात नोकरी करीत असलेल्या तरुणांच्या मनात हीच भावना येत असल्याचे सोशलमिडीयावरील पोस्ट वरून दिसत आहे. आम्ही ही माणसे आहोत, आम्हालाही आमच्या गावात ताठ मानेने जगण्याचा अधिकार आहे अशा आशयाच्या पोस्ट सध्या व्हाट्सअप व फेसबुक वर व्हायरल होत आहेत.

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

सध्या राज्यात पुणे मुंबई येथे कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर आढळले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पुणे मुंबई येथुन आलेल्या ग्रामस्थाकडे संशयाच्या नजरेने पाहत असल्याने त्यांच्या मनात आज नाराजी पसरली आहे. असे तरुण आज सोशलमिडीयाचा आधार घेत आपल्या भावना व्यक्त करीत असून त्या चांगल्याच व्हायरल होताना दिसत आहेत.

पुणे, मुंबई अथवा इतर शहरांतून आलेल्या नागरिकांनी त्यांना ताप, खोकला, सर्दी अथवा कोरोनाचे कोणतेही लक्षणं असतील तर तातडीने आरोग्य केंद्रात येउन तपासणी करून घ्यावी. तसेच ज्यांना होम क्वॉरंटाइन मध्ये राहण्यास सांगितले आहे त्यांनी त्याचे पालन करावे.
- डॉ. धनंजय सावंत, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, चापोली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Migrants From Latur To Pune Mumbai Expressed Feelings On Social Media